
‘आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत. हा एकनिष्ठांचा महासागर या गद्दांरांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही. गद्दारांनो, शिवसेना जागेवरच आहे आणि तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा विधानसभा लोकसभेकडे जाईल’, अशा शब्दात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी यवतमाळ येथील गद्दार खासदारांवर निशाणा साधला. यवतमाळमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना संजय राऊत यांनी गद्दार खासदारांना जोरदार तडाखे दिले. ”पाचशे रुपये किंमत नसलेला इथल्या खासदारांच्या खांद्यावर उद्धव ठाकरेंनी भगवी शाल टाकली त्यामुळे त्याची किंमत 50 कोटी झाली. मात्र पुढच्या निवडणूकीत त्याला पाच रुपयांची देखील किंमत राहणार नाही’, असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
”आम्ही शिवसेनेबरोबर निष्ठेने राहतो म्हणजे काही उपकार करत नाही. लाखो निष्ठावंत शिवसैनिक आहेत म्हणून ही शिवसेना अनेक संकटात, वादळात उभी आहे. कृषी उत्पन्न बाजारत समितीत ही सभा सुरू आहे. इथे शेतकऱ्यांचा माल येतो विकला जातो. त्याला काही फार भाव मिळत नाही. पण पंधरा दिवसांपूर्वी इथे एक माल आला आणि पन्नास कोटीला विकला गेला तुमचा खासदार. खासदार गेले आता त्यांच्या दुखवट्याला आपण आलो आहोत. दहावं, बारावं करू आणि पुढल्या कामाला मोकळे होऊ”, असे संजय राऊत म्हणाले.
या खासदाराची पाच रुपये किंमत राहणार नाही
”या खासदाराचा 50 कोटी भाव झाला आहे. खरंतर या बाजार समितीत पाचशे रुपयाला देखील कुणी विकत घेतलं नसतं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या खांद्यावर भगवी शाल टाकली आणि म्हणून त्याची किंमत 50 कोटी झाली. उद्याच्या निवडणूकीत त्याची किंमत पाच रुपये देखील राहणार नाही अशी निवडणूक होणार आहे.”, असे देखील संजय राऊत म्हणाले.
मोदींचे बूट चाटायला गेले
”गद्दार खासदार म्हणतात की ते विकासनिधीसाठी गेले. मला माझ्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. अरे कसला विकास करणार तुम्ही. बारा वर्षात नरेंद्र मोदी या देशाचा विकास करू शकले नाहीत. त्या नरेंद्र मोदींच्या वाराणसीत जाऊन बघा. रस्ते नाही, पाणी नाही, पूल नाही. ज्या मोदींचे बूट चाटायला गेलात ते विकास करू शकले नाहीत. तुम्ही काय विकास करणार. ज्याने राम मंदिराची लूट केली. दान पेटीतले दोन हजार कोटी चोरले त्या मोदींचे बूट चाटायला हे गेले”, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली.
गद्दारी करायचीय तर राजीनामा द्या
”त्या खासदाराला जाऊन सांगा ही शिवसेना आहे, शिवसेना कधी संपत नसते, ठाकरे कधी संपत नसतात. ते पुन्हा पुन्हा राखेतून उभे राहतात आणि या महाराष्ट्रावर आपली पकड मजबूत ठेवतात. तुम्ही मशालीच्या चिन्हावर निवडून आलात म्हणजे ही मतं लोकांनी उद्धव ठाकरेंना दिली आहेत. गद्दारी करायचीय तर राजीनामा द्या आणि निवडणूकीला उभे रहा. मग तुम्हाला कळेल की इथली जनता गद्दारांसोबत आहे की निष्ठावंतांसोबत आहे. एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आम्ही सगळे एकनिष्ठ आहोत. हा एकनिष्ठांचा सागर महासागर लाटा, या गद्दांरांना तडाखे देऊन तुडवल्याशिवाय राहणार नाही”, असे संजय राऊत म्हणाले
शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा लोकसभेकडे जाईल
”उद्धव ठाकरे यांचे काल नागपूर विमानतळावर दणक्यात स्वागत झालं. प्रचंड गर्दी होती. ती गर्दी एकनाथ शिंदे, गद्दारांनी बघितली तर त्यांना कळेल की शिवसेना जागेवरच आहे आणि तुमच्या छाताडावर पाय देऊन पुन्हा एकदा विधानसभा आणि लोकसभेकडे जाईल. आजची सभा, मेळावा आम्हाला तेच सांगतोय. यवतमाळ हा कायम बाळासाहेबांवर प्रेम करणारा जिल्हा राहिलाय. तो कायम राहिल. आपण यापुढे आपण सगळे शिवसैनिक उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या मागे ठाम पणे उभे राहू आणि या यवतमाळच्या मातीला पुन्हा गद्दारीचा कीड लागणार नाही अशा प्रकारची लोकं निवडून देऊ”, असे आवाहन संजय राऊत यांनी जनतेला केले.




























































