धुळमुक्त वारी, पंढरपूर नगरपरिषदेचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 25 जुलै रोजी आषाढी वारीचा सोहळा पंढरपूर साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर विठुरायाची नगरी धुळमुक्त करण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेने शहरातील प्रमुख रस्त्यावरील माती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. या कामामुळे भाविकांची वारी धुळमुक्त होण्यास मदत होणार आहे.

पंढरपूर शहरातील रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. वारीपूर्वी या रस्त्यांची डागडुजी केली जाते मात्र वारी नंतर रस्ते जैसे थे असतात. रस्त्यांची रुंदी करताना फुटपाथ आणि डांबरी रस्ता यामध्ये मातीचे रस्ते सोडल्याने बाजूला असलेली माती रस्त्यांवर येते आणि वाहनाच्या वाहतुकीतून ती हवेत उडत राहते. मातीच्या धुळीमुळे रस्त्यांच्या बाजूच्या व्यापाऱ्यांना दिवसातून दहा वेळा धूळ झटकावी लागते. चालणाऱ्या भाविकांना या धुळीचा मोठा त्रास होत असतो. वारीच्या गर्दीत तर मंदिर परिसर, आणि वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर धुळीचे लोट उठलेले असतात.

नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी यंदाची वारी धुळमुक्त करण्याचा चंग बांधला असून शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील साठलेली माती गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. रस्त्यावरील माती काढल्याने शहरातील धुळीचा त्रास हा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. तथापि शहरातील रस्ते करताना बाजूला मातीचे रस्ते राहणार नाहीत याची दक्षात घ्यायला हवी.