
आसामला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढलं आहे. पावसाच्या धुवाँधार बॅटींगमुळे आसाममध्ये पूर आला असून हाहाकार माजला आहे. राज्यातील धेमाजी, दिब्रुगड, चिरांग, लखीमपूर आणि नलबारी या 5 जिल्ह्यांमधील जवळपास 45 हजारांहून अधिक नागरिक या पुरामुळे प्रभावित झाली आहेत. या पाच जिल्ह्यांपैकी धेमाजी जिल्ह्याला या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पुराच्या तडाख्यामुळे सिमेन नदीवरील 300 मीटर लांबीचा लोखंडी पूल तुटला आहे. पूल तुटल्यामुळे मुर्कोंगसेलेक आणि शिलापाथर दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.
आसामचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्तांच्या सुरक्षेला आणि पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगत सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच वायुसेना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहे. आसाममध्ये दरवर्षी येणाऱ्या या विनाशकारी पुरामागे प्रामुख्याने पाच मोठी कारणे आहेत. मान्सूनमधील अतिवृष्टी आणि ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्यांना येणारा पूर ही नैसर्गिक कारणे तर आहेतच, पण त्याचसोबत डोंगराळ भागातून वाहून येणारी माती नद्यांच्या पात्रात साचल्याने नद्यांची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमालीची कमी झाली आहे. जंगलांची मोठ्या प्रमाणावर होणारी कत्तल मृदेच्या धूपेला कारणीभूत ठरत असून, नदीकाठच्या नैसर्गिक पूर मैदानावरील अनियोजित बांधकामे आणि अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला जात आहे. राज्याचा 40 टक्क्यांहून अधिक भाग पूरप्रवण क्षेत्रात येत असल्याने दरवर्षी लाखो लोकांना या आपत्तीचा सामना करावा लागतो.




























































