
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सध्या देशभरात गाजत असून, यामुळे रामभक्त आणि जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सकल हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे पुढारीही यावर मौन बाळगून आहेत. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. श्रीरामाचा लुटलेला एकही पैसा भाजपला पचवू देणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. ते बुधवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
माध्यम प्रतिनिधिंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, राम मंदिराचा विषय साधा नाही. घराघरातून पाच, दहा रुपये गोळा करत रामाच्या कार्यामध्ये जनतेला सामील करून घेतलेले आहे. तो प्रचार होता आणि असे कोट्यवधी रुपये जमा झाले. 2014 पासून राम मंदिराच्या नावावर 17 हजार कोटी रुपये जमा केले, ते पैसे आणि त्याचा हिशेब कुठे आहे? राम मंदिराच्या दानपेटीतून साडे पाचशे कोटी रुपये गायब झाले. हा पैसा प्रभू श्रीरामाचा असून त्याचा हिशेब कुठे आहे?
राजा भरत याने सिंहासनावर श्रीरामाच्या पादुका ठेवून 14 वर्षे राज्य केले. पण रामाच्या एक पैशाचीही अफरातफर केली नाही. हे हिंदूत्व आहे. पण भाजपने दोन वर्षांमध्ये रामाचे सिंहासन, मुकूट, माळ, खजिना लुटला. रावणानेही रामाचा खजिन लुटला नव्हता. रावणाने श्रीरामाचा आदर केला होता. पण भाजप रामाचा खजिना लुटत आहे. भाजपचे लोक महमूद गझनीचेही बाप झाले आहेत. गझनीने सोमनाथ मंदिर 17 वेळा लुटले. पण भाजपने 45 दिवसात 70 वेळा राम मंदिराची तिजोरी लुटली आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कुठे गेला आहे सकल हिंदू समाज आणि सकल हिंदू समाजाचे नेतृत्व करणारे मंत्रिमंडळातील पुढारी? रामची लुट हा हिंदुत्वाचा विषय नाही का? स्वत:ला छोटे शंकराचार्य समजतात आणि हिंदुत्वावर प्रवचन झोडतात ते राम मंदिर लुटणाऱ्यांवर बोलले का? सकल हिंदू समाजाला रस्त्यावर आणले का? देवेंद्र फडणवीस हिंदुत्ववादी आहेत, पण ते यावर बोलले का? कुंभमेळा मंत्री बोलले का? असा सवाल करत आम्ही यांना रामाचा लुटलेला एक पैसाही पचवू देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.
राम मंदिर देणगी घोटाळा व अयोध्येमध्ये दडपशाही, काँग्रेस नेते अजय राय नजरकैदेत
राम मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाल राय यांच्यासह अयोध्येच्या माजी महापौरांनाही अटक करण्याची मागणीही राऊत यांनी केली. राम मंदिर लुटणे हा रामद्रोह आणि देशद्रोह आहे. हे दुसऱ्या कुणी केले असते तर संपूर्ण भाजप हिंदुत्व धोक्यात आले असे म्हणत रस्त्यावर उतरली असते. राम मंदिर हे देशाचे, हिंदुत्वाचे राष्ट्रीय प्रतिक आहे. तेच भाजपने लुटले असून याच्या चौकशीसाठी सर्वपक्षिय समिती नेमा, अशी मागणीही राऊत यांनी केली. तसेच या रामद्रोह्यांविरुद्ध शिवसेना आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.
शिवसेना कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे; लाभार्थी इकडून तिकडे जाताहेत! – संजय राऊत





























































