
अखेर आज जोरदार पाऊस ‘लागला’ आणि अक्षरशः दाणादाण उडाली. सकाळी रस्त्यावरील खड्डे चुकवत कामावर जाण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्टेशन गाठले खरे, पण तुफान पावसामुळे गाडय़ा लेट होत्या. त्यामुळे दादर, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. या पावसामुळे शीव-पनवेल, कल्याण-शीळफाटा, मुंबई-नाशिक या महामार्गांवरील वाहतूक बराच वेळ ‘तुंबली’. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावच्या काळ नदीवर नव्याने बांधलेला पुलाचा भराव अवघ्या पंधरा दिवसातच खचला तसेच खड्डेही पडले. त्यामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला.
पालघर, रायगडमध्ये शाळांना आज सुट्टी
पालघर जिह्याला उद्या 2 जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व आयटीआय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर रायगड जिल्हय़ातही सात तालुक्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
चेंबूर दुर्घटना; तीन अधिकारी निलंबित
चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मंगळवारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एम / पश्चिम विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, सहाय्यक अभियंता योगेश पार्टे, दुय्यम अभियंता अरुण मुंढे यांना आज निलंबित करण्यात आले.
आंबेनळी घाटात दरड कोसळली
कोकण, महाबळेश्वरला जोडणाऱ्या पोलादपूरमधील आंबेनळी घाटात दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली. नंतर दरड हटवण्यात आली.
पवई तलाव तुडुंब
मुंबईत दमदार पाऊस कोसळत असून आज पहाटे 5.30 वाजल्यापासून पवई तलाव तुडुंब भरून वाहू लागला आहे. गेल्या वर्षी 18 जूनला पवई तलाव ओव्हरफ्लो झाला होता.
वाळकेश्वरमध्ये बाल्कनी कोसळून एकाचा मृत्यू




























































