
ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज १२९ अधिकाऱ्यांच्या होलसेल बदल्या केल्या. गेली अनेक वर्ष अंतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे बदल्यांचा हा निर्णय घेतला असून यामध्ये १६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचीही ‘उचलबांगडी’ केली आहे. दरम्यान या बदल्यांमुळे विविध विभागांच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
बदल्यांमध्ये १६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह एकूण ५६ पोलीस निरीक्षक ५१ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि २१ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. विविध पोलीस ठाण्यांसह अनेक विभागांत या अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. बदली आदेशांवर विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांची स्वाक्षरी असून नव्याने नियुक्त झाले अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
पोलीस आयुक्तालयाला नवे एसीपी
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या फळीला बळकटी मिळावी यासाठी शासनाने सहा नव्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या (एसीपी) नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. विविध विभागांतून बदली होऊन आलेल्या या अधिकाऱ्यांकडे आयुक्तालयातील महत्त्वाच्या शाखांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातून बदली होऊन आलेले मदन बल्लाळ यांना गुन्हे विभाग, भास्कर पुकळे प्रशासन तर ममता डिसोजा यांची वर्तकनगर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी लवकरच आपल्या नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणार असून त्यांच्या नियुक्तीमुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध शाखांच्या कामकाजात अधिक समन्वय आणि गतिमानता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.































































