
कर्जाचा डोंगर, वाढती महागाई आणि सावकारी फासामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मृगजळ दाखवून फडणवीस सरकार खासदार, आमदार फोडाफोडीत रममाण झाले. राज्यात सरकारची अवस्था मेल्यागत झाली असून प्रशासनावर सुतकळा पसरली आहे. अशा भयग्रस्त वातावरणात जगण्यापेक्षा मरण परवडले म्हणून निलंगा तालुक्यात गेल्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यापैकी एक आत्महत्या तर कृषिदिनाच्या दिवशीच झाली आहे.
निलंगा शहरातील गांधीनगर भागात राहणारे मधुकर तुकाराम पाटणकर (५३) यांनी बँक तसेच खासगी सावकाराकडून कर्जाच्या वसुलीसाठी लागलेल्या तगाद्यामुळे वैतागून कृषिदिनीच घरातल्या पंख्याला गळफास घेतला. मधुकर पाटणकर हे अल्पभूधारक शेतकरी होते. पाऊस पडला तरी पेरणी करण्यासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे ते चिंतेत होते. ‘मी कर्जाला कंटाळून आणि शेतात पेरणी करण्यासाठी बी-बियाणे घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या करत आहे’ अशी चिड्डी त्यांच्या खिशात सापडली. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
निलंगा तालुक्यातील जामगा येथील पंडित रामा पवार (४८) यांनी ३० जून रोजी सकाळी सहाच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. शेतीवरील कर्जाचे ओझे असह्य झाल्यानेच त्यांनी आपले जीवन संपवले.
सोनखेड येथील मारुती मनोहर सोळुंके (३६) या तरुण शेतकऱ्याने कर्जामुळे होणाऱ्या ओढाताणीतून २५ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर २७ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.
माने कुटुंबाची शोकांतिका वेदनादायी
तालुक्यातील अनसरवाडा येथील अल्पभूधारक शेतकरी गुणवंत व्यंकटराव माने (६५) यांनी कर्ज आणि सततच्या आर्थिक विवंचनेला कंटाळून ३० जून रोजी शेतातच गळफास घेतला. या कुटुंबाची शोकांतिका अत्यंत वेदनादायी आहे. गुणवंतराव यांच्या एका मुलीचा काही वर्षांपूर्वीच सर्पदंशाने मृत्यू झाला होता. या धक्क्यातून माने कुटुंब सावरत नाही तोच दोन वर्षांपूर्वी त्यांच्या धाकट्या मुलाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. तर दुसऱ्या मुलाला कर्करोगाने ग्रासले. उपचार सुरू असतानाच त्याचाही मृत्यू झाला. काही वर्षांच्या अंतराने तीन तरुण अपत्यांचा मृत्यू झाल्याने गुणवंतराव खचून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विधवा सुना, तीन नातू आणि दोन नाती असा परिवार आहे.






























































