Ashadhi Wari 2026 – यंदा कमी वजनाचा लक्षवेधी पालखी रथ; आळंदीत बांधणी, सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असून, यंदा ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्यात सुमारे ३० लाख रुपये खर्चुन आळंदी देवस्थानच्या वतीने नवीन लक्षवेधी पालखीरथ आणण्यात येत आहे. रथबांधणीचे, सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्यात आले असून, या पालखीरथाचे वजन पूर्वीच्या रथाच्या वजनापेक्षा सुमारे एक टनने कमी असल्याने बैलजोडीस रथ ओढणे सुखकर आणि सहज होणार आहे. रथावर लक्षवेधी नक्षीकामासह पारंपरिक देवदेवतांच्या प्रतिमा असणार आहेत. आळंदी देवस्थानसह नगरपरिषद, पोलीस स्टेशन, वीज वितरण कंपनी आणि ग्रामीण रुग्णालय पालखी सोहळ्याच्या तयारीत व्यग्र आहे. सर्वत्र पालखी सोहळ्याची लगबग सुरू असून, तयारी अंतिम टप्प्यात आली असून, अलंकापुरी वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.

दरम्यान, आषाढी वारी पालखी सोहळा-२०२६अंतर्गत सप्ताहास हरिनामाच्या गजरात पालखी सोहळाप्रमुख अॅड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते पूजा करून प्रारंभ झाल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर यांनी दिली. १ ते ८ जुलै या कालावधीत सप्ताह साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात सायंकाळी चार ते पाच या वेळेत प्रवचन आणि सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळात कीर्तनसेवा होणार आहे.

मानाच्या बैलजोड्यांची पूजा

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीरथ ओढण्याचा मान रानवडे कुटुंबांच्या तीन बैलजोड्यांना देण्यात आला आहे. मानाच्या बैलजोड्यांची पूजा आणि पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली. यावेळी त्यांनी उमेश रानवडे यांच्या ‘हिरा-लाडक्या’, तुळशीराम रानवडे यांच्या ‘सूर्या-रामा’ आणि हर्षवर्धन रानवडे यांच्या ‘भीम-अर्जुन’ या बैलजोड्यांची पाहणी केली. त्यांच्यासमवेत राजेंद्र पवार यांच्यासह माजी नगराध्यक्ष देवकाते, विद्यमान नगरसेवक राहुल चिताळकर-पाटील, नितीन साळुंखे, अनिकेत कुऱ्हाडे, शीतल रानवडे, पै. शिवाजीराव रानवडे, साहेबराव कुऱ्हाडे, सौरभरानवडे, सचिन रानवडे, सौरभ गव्हाणे, प्रियेश रानवडे आदी उपस्थित होते.

आळंदीत पालखी सोहळ्याची तयारी

आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असून, श्रीक्षेत्र आळंदी येथे दुकानांमध्ये पारंपरिक वीणा, टाळ, मृदंग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. या वाद्यांनी दुकाने फुलली आहेत.