Chandrapur news – नवजात बाळाच्या विक्रीप्रकरणी भाजपाच्या 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशांच्या हव्यासापोटी अवघ्या काही दिवसांच्या नवजात बाळाचा सौदा करणाऱ्या चंद्रपूरमधील धक्कादायक रॅकेटचा रामनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता थेट राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले असून, या मानवी तस्करी प्रकरणात भाजपच्या दोन प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अत्यंत गोपनीय आणि कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल महिनाभरानंतर या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील कट्टर कार्यकर्त्या आणि भाजपच्या महिला पदाधिकारी सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत सुन्न करणारी आहे. एका नराधमाने अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला होता. या अत्याचारातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका बाळाला जन्म दिला. मात्र, समाजाच्या भीतीने आणि पैशांच्या हव्यासापोटी त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या स्वतःच्या सख्ख्या आईनेच मध्यस्थांच्या मदतीने या नवजात बाळाचा सौदा केला होता.

या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 जणांना गजाआड केले आहे. पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा मुख्य आरोपी अजय फुलझेले, पीडित मुलीची आई, बाळ विकत घेणाऱ्या दोन महिला आणि बालक विक्रीचा सौदा घडवून आणण्यात मध्यस्थी करणाऱ्या भाजपच्या दोन महिला पदाधिकारी अशा सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हे केवळ एकच प्रकरण आहे की चंद्रपूर आणि परिसरात असे मानवी तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे, याचा शोध रामनगर पोलीस घेत आहेत. या रॅकेटमध्ये आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही संशयास्पद माहिती असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.