FIFA World Cup 2026 – हॅरी केनचा ‘डबल’ धमाका; इंग्लंडची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक, डीआर काँगोच्या स्वप्नांचा चक्काचूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फिफा विश्वचषकात बुधवारी फुटबॉल विश्वाने थरारक सामना अनुभवला. स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या इंग्लंडला कर्णधार हॅरी केन याने अक्षरश: पराजयाच्या जबड्यातून बाहेर काढले. सामन्याच्या अखेरच्या काही मिनिटांत केनने डागलेल्या एका थरारक गोलच्या जोरावर इंग्लंडने डीआर काँगोचा 2-1 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे. उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये इंग्लंडचा सामना यजमान मेक्सिकोविरुद्ध होणार आहे.

खचाखच भरल्या मैदानात सामना सुरू होताच अवघ्या 7 व्या मिनिटाला डीआर काँगोच्या ब्रायन सिपेन्गाने गोल झळकावून इंग्लंडच्या गोटात खळबळ माजवली. थॉमस टुचेल यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरलेला इंग्लंडचा संघ 1-0 अशा पिछाडीवर पडल्याने चाहत्यांचा श्वास रोखला गेला होता. काँगोचा गोलरक्षक लिओनेल म्पासी हा जणू भिंत बनून उभा होता. त्याने जुड बेलिंगहॅम आणि रॅशफोर्डचे अनेक चपळ प्रयत्न हाणून पाडले. इंग्लंडला बरोबरी साधण्यासाठी पूर्वार्धाची वाट पहावी लागली.

सामन्याच्या 75 व्या मिनिटाला हॅरी केनने पहिला गोल डागत इंग्लंडला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पण, खरा थरार 86 व्या मिनिटाला पाहायला मिळाला. पेनल्टी बॉक्सच्या अगदी बाहेर चेंडू मिळताच, केनने तो आपल्या उजव्या पायावर शिफ्ट केला आणि एक असा तुफानी शॉट मारला की काँगोच्या गोलरक्षकाला हालचाल करण्याचीही संधी मिळाली नाही. चेंडू थेट जाळ्यात पोहोचला आणि इंग्लंडच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

पेले यांचा विक्रम मोडीत

दरम्यान, या ऐतिहासिक दोन गोल्ससह हॅरी केनने विश्वचषकात आपले 13 गोल पूर्ण केले आहेत. त्याने महान फुटबॉलपटू पेले यांचा 12 गोलचा विक्रम मोडीत काढला आहे. केन आता इंग्लंडसाठी विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. चालू विश्वचषकात केनचे 5 गोल झाले असून, तो लिओनेल मेस्सी आणि एम्बाप्पेच्या (प्रत्येकी 6 गोल) अगदी जवळ पोहोचला आहे.

जगातील सर्वोत्तम स्ट्रायकरपुढे पराभूत झालो

दरम्यान, आम्ही इंग्लंडला पूर्णपणे कोंडीत पकडले होते, पण मोठ्या संघांमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता असते. शेवटी इंग्लंडला वाचवण्यासाठी जगातील सर्वोत्तम स्ट्रायकरलाच पुढे यावे लागले. आम्ही पराभूत झालो असलो तरी मोठ्या संघांना नडलो याचा सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया डीआर काँगोचे प्रशिक्षक सेबॅस्टियन देसाब्रे यांनी दिली.