
राजधानी दिल्लीमध्ये पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या इशाऱयावर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा मोठा कट दिल्ली पोलिसांनी उधळला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ‘आयएसआय’साठी काम करणाऱया चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी तिघांना पंजाब तर एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. हे चौघेही पाकिस्तानातील ‘आयएसआय’चा हँडलर शहजाद भट्टी याच्या थेट संपर्कात होते आणि त्याच्याच इशाऱयावर योजना आखत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
शुभदीप सिंग (23), गुर्जंत सिंग (22), साजन सिंग (28) आणि गगनप्रीत (24) अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. विशेष पथकाचे उपायुक्त प्रवीणकुमार त्रिपाठी यांनी सांगितले की, गगनप्रीतला 24 एप्रिल रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती. त्याच्या तपासातून मोठा आंतरराष्ट्रीय कट उघडकीस आला आहे. त्यात ड्रोनद्वारे अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांची तस्करी आणि स्थानिकांची दहशतवादी नेटवर्कमध्ये भरती करण्याचा डाव होता. हे दहशतवादी मॉडय़ूल शहजाद भट्टी चालवत होता. तो पंजाबमध्ये स्थानिक तरुणांना जाळ्यात ओढून भरती करायचा. सुरक्षा यंत्रणांना हुलकावणी देण्यासाठी त्याने अटक केलेल्या दहशतवाद्यांना परदेशातील मोबाईल सिमकार्ड दिले होते. त्यांना दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्याचे काम सोपवण्यात आले होते, असे त्रिपाठी म्हणाले. दहशतवादी कारवाया आणि नार्को टेरर फंडिंगसाठी या नेटवर्कचा वापर केला जात होता. या संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्यात येत आहे. मे महिन्यातदेखील अशाच एका नेटवर्कला दिल्ली पोलिसांनी उद्ध्वस्त केले होते.
धार्मिक स्थळे, पोलीस संस्थांची रेकी करणार होते
गगनप्रीत याच्याकडे दिल्लीतील महत्त्वाची धार्मिक स्थळे तसेच पोलिसांच्या ठिकाणांची रेकी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमधून डिजिटल पुरावे हाती आले आहेत. त्याने विविध ठिकाणांचे व्हिडीओ पाकिस्तानात पाठविले होते. दिल्लीत गोळीबार घडवून आणण्याच्या सूचना त्याला पाकिस्तानातून मिळाल्या होत्या. गुर्जंत सिंग हा हँडलर्सच्या संपर्कात होता. त्याचा चुलत भाऊ साजन सिंग याला पाकिस्तानातून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रs मिळाली होती. साजन याला यापूर्वीही ड्रग्जप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती त्रिपाठी यांनी दिली.





























































