
<<नरेंद्र क्षीरसागर>>
सध्या पश्चिम युरोपातील एक मोठा भाग वसंत ऋतूत भीषण उन्हाळ्याचा सामना करत आहे. उत्तरेत ब्रिटन आणि आयर्लंडपासून ते जर्मनीपर्यंत तसेच फ्रान्स व दूरवर दक्षिणेकडे स्पेन आणि इटलीपर्यंतच्या भागात सध्या सरासरीपेक्षा अधिक तापमान राहताना दिसून येत आहे.
वसंत ऋतूतील जीवघेण्या उष्णतेमागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हीट डोम होय. उत्तर आफ्रिकेतून येणाऱया हवेचा मोठा दबाव असणारा हीट डोम ही एक वातावरणातील अभेद्य स्थिती असून ती हळूहळू वाटचाल करत आहे. या हीट डोमने युरोपवर गरम वारे बांधून ठेवले असून ते एखाद्या उकळत्या पाण्यावर झाकण ठेवल्यासारखे आहे. युरोपियन संघाच्या कोपर्निकस क्लायमेंट चेंज सर्व्हिसच्या मते, गेल्या पंचवीस वर्षांत युरोपात अशा प्रकारचे हवामान राहताना दिसते आणि त्यामुळे अनेकदा खूप गरम वारे वाहताना दिसतात. इम्पीरियल कॉलेज लंडनमध्ये क्लायमेट सायन्सचे प्रोफेसर फ्रेडरिक ओटोच्या मते, पूर्वी युरोपात अशा प्रकारची उष्णता कधीतरी पाहावयास मिळत असे. विशेष म्हणजे कमाल तापमान अधिक राहत असताना उष्ण वारे अनुभवास येत होते, पण आता विक्रमी उष्णता ही हवामान बदलाच्या परिणामांची जाणीव करून देत आहे.
जिवाश्म इंधनामुळे होणाऱया उत्सर्जनामुळे होणारा ग्रीन हाऊस इफेक्ट युरोपमधील वाढत्या तापमानाला कारणीभूत असल्याचे म्हणणे घाईचे ठरू शकते. अर्थात 2003 नंतर युरोपात उष्णतेच्या लाटेमुळे घडलेल्या घटनांचा अभ्यास केला असता ते वातावरणाचे सत्यकथन करतात. ब्रिटनची संस्था ‘वर्ल्ड वेदर अॅट्रिब्युशन‘च्या हवामान तज्ञांच्या मते, मानवामुळे होणाऱया हवामान बदलामुळे वातावरणाचे धोकादायक रूप हे पूर्वीपेक्षा अधिक पाहावयास मिळत आहे.
एप्रिलमध्ये जारी ‘युरोपियन स्टेट ऑफ द क्लायमेट’च्या ताज्या अहवालानुसार, 2025 च्या काळात युरोपात किमान 95 टक्क्यांपेक्षा अधिक दिवसांत सरासरी कमाल तापमान अधिक असल्याचे नोंदले गेले आहे. या भीषण उष्णतेचे कारण म्हणजे आक्&िटक सर्कलसारख्या (ध्रुवीय सर्कल) थंड वातावरणातील तापमान तीस अंशांपेक्षा अधिक राहणे होय. याशिवाय समुद्राच्या पृष्ठभागातील तापमान आजवरच्या इतिहासात सर्वात उष्ण असल्याचे नोंदले गेले. अहवाल तयार करणाऱया संस्थांपैकी एक ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टस्’चे प्रमुख फ्लोरिया पेपेबर्ग म्हणाले, युरोप आता सर्वात वेगाने उष्ण होणारे खंड बनले आहे आणि त्याचे दुष्परिणाम आतापासूनच धोकादायक रूपातून पाहावयास मिळत आहेत. वास्तविक युरोप हा संपूर्ण जगाच्या तुलनेत दुपटीने उष्ण होत आहे. 19 व्या शतकाच्या अखेरीस पूर्व औद्योगिक पातळीच्या तुलनेत आज युरोपचे तापमान सरासरी 2.5 अंशांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण जगाचा विचार केल्यास तज्ञांनी जागतिक पातळीवर तापमान वाढीची सरासरी केवळ 1.4 अंश सेल्सियस नोंदवली आहे.
उष्णता वाढीमागचे कारण
युरोपात वेगाने उष्णता वाढण्यामागचे कारण काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. यामागचे कारण म्हणजे त्याची भौगोलिक स्थिती. प्रत्यक्षात युरोप हा थेटपणे आर्किटकशी जोडलेला असून आर्किटक हे वेगाने उष्ण होणाऱया जगातील एकमेव ठिकाण ठरत आहे. युरोपियन संघाच्या कोपर्निकस क्लायमेट चेंज सेवेच्या डेटानुसार, उत्तर ध्रुवाजवळ सरासरी तापमानाचे प्रमाण 3.3 अंश सेल्सियसपेक्षा अधिक वाढले आहे. यामागचे कारण म्हणजे आक्&िटक समुद्राचे पाणी वाढणे आणि बर्फ तयार होत नसल्याने ओकेबोके दिसणारे पर्वत सूर्याचा प्रकाश अधिक शोषून घेत आहेत. बर्फाच्छादित पर्वत हे सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करतात आणि त्याचे किरण परत पाठवतात. या संपूर्ण प्रक्रियेला अल्बेडो इफेक्ट असे म्हणतात, पण आता बर्फाविना असणारे पर्वत उष्णता अंगावर घेत आहेत. या गोष्टी सध्या युरोपात घडत आहेत. युरोपमध्ये संपूर्ण वर्षभर किंवा उन्हाळ्याच्या शेवटर्पंत ज्या ठिकाणी बर्फ असायचा त्या आल्प्सच्या पर्वतरांगांत आता वेगाने बर्फ वितळत आहे. जेव्हा बर्फ काढला जातो तेव्हा जमीन सूर्यप्रकाश परत पाठवू शकत नाही आणि उलट ती शोषून घेते. या कारणामुळे तेथे उष्णता वेगाने वाढताना दिसून येत आहे.
बदलत्या हवामानामुळे पॅटर्नमध्ये बदल
शास्त्रज्ञांच्या मते, युरोपात वाढत्या उष्णतेचा संबंध ‘जेट स्ट्रीम’च्या बदलत्या रूपाशीदेखील आहे. जेट स्ट्रीम हा एक प्रकारे आकाशात खूप उंचीवर वाहणारा वारा असून तो पश्चिमेकडून युरोपकडे जातो. पूर्वी हे वारे शांत आणि स्थिर असायचे. मात्र हवामान बदलामुळे त्यांच्यात बदल झाला आहे. काही काळ स्थिर असणारे वारे आता हवामान बदलामुळे विस्कळीत झाले आहेत. हवामानाच्या स्वरूपात बदल होत असल्याने वाऱयांना अडथळे येत आहेत. परिणामी बराच काळ उष्णता सहन करावी लागते.
स्वच्छ हवेमुळे पृथ्वीचे वाढतेय तापमान
या स्थितीची दुसरी बाजू म्हणजे पर्यावरणाची समस्या कमी करण्याच्या प्रयत्नांमुळे युरोपात उष्णता वाढीत योगदान दिले आहे. 2025 च्या ‘युरोपियन स्टेट ऑफ द क्लायमेट’च्या बातमीनुसार, 1980 च्या दशकात हवेतील गुणवत्ता राखण्याबाबत लागू केलेले कडक नियम पाहता वातावरणातील प्रदूषण कमी झाले. मात्र आता हेच नियम तापमान वाढीलाही कारणीभूत ठरत आहेत. स्वच्छ हवेशी संबंधित नियमांची अंमलबजावणी होण्यापूर्वी गाडय़ांचा धूर, कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारे लहान आकारातील सल्फेट आणि नायट्रेटचे कण सूर्यप्रकाश परत पाठवत असत. त्याची तीव्रता कमी ठेवण्यास मदत करत असत. त्यामुळे काही प्रमाणात युरोपात थंड वातावरण असायचे. परिणामी ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जनामुळे वाढणारे तापमान काही प्रमाणात रोखण्यास मदत मिळायची. अर्थात तज्ञांच्या मते, याचा अर्थ असा नाही की, जगाने प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न सोडून द्यायला पाहिजेत.





























































