
हवामान विभागाने मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिल्यामुळे ठाणे, पालघर, रायगडसह रत्नागिरी जिह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली आहे. मंगळवारी या जिह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तीव्र शक्यता आहे. रत्नागिरी जिह्यात आधीच अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, खेड तालुक्यातील ‘जगबुडी’ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अतिवृष्टीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱयांनी हा निर्णय जाहीर केला आहे.





























































