विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ अडकलेल्या मच्छिमाराची नौदलाकडून हेलिकॉप्टरद्वारे सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळ समुद्रात अडकलेल्या एका मच्छिमाराची भारतीय नौदलाने यशस्वी सुटका केली आहे. पूर्व नौदल कमांडच्या एएलएच एमके-III (ALH Mk III) हेलिकॉप्टरच्या मदतीने ही बचावमोहीम पार पडली असून, मच्छिमाराला वैद्यकीय उपचारानंतर नागरी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मच्छिमाराची मासेमारीची बोट समुद्रात बेपत्ता झाली होती. त्यानंतर 5 जुलै रोजी जवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजाने त्याला सुरक्षितरित्या वाचवले. 6 जुलै रोजी नागरी प्रशासनाच्या विनंतीनुसार भारतीय नौदलाने हेलिकॉप्टरद्वारे व्यापारी जहाजावरून ‘रेस्क्यू होईस्ट’च्या साहाय्याने मच्छिमाराला बाहेर काढले.

 

बचाव मोहिमेदरम्यान मच्छिमाराला हेलिकॉप्टरमध्येच प्राथमिक वैद्यकीय मदत देण्यात आली. त्यानंतर त्याला विशाखापट्टणम येथे आणून नागरी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. याचदरम्यान, 4 जुलै रोजी मुंबई किनाऱ्याजवळही भारतीय नौदलाने आणखी एक यशस्वी बचावमोहीम राबवली होती. आयएनएस शिक्रावरील सी किंग हेलिकॉप्टरने एमटी देशशक्ती या क्रूड ऑइल टँकरवरील जखमी खलाशाला प्रतिकूल हवामानात सुरक्षितपणे बाहेर काढून तातडीच्या उपचारांसाठी किनाऱ्यावर आणले. असे वृत्त इकाॅनाॅमिक टाइम्स ने दिले आहे.

 

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या निर्देशानुसार, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ बेपत्ता झालेल्या सात मच्छिमारांचा शोध सुरू ठेवत आहेत. हे मच्छिमार 1 जुलै रोजी पहाटे विशाखापट्टणम फिशिंग हार्बरमधून मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. खराब हवामानामुळे शोधमोहीम आव्हानात्मक ठरत असली तरी नौदलाची हेलिकॉप्टर्स, तटरक्षक दलाची जहाजे आणि स्थानिक प्रशासन समन्वयाने बचावकार्य सुरू ठेवत आहेत.