
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी केंद्र सरकारकडे पेट्रोल पंपांवर ग्राहकांना E20, E10 आणि E0 या इंधन मिश्रणांपैकी त्यांच्या पसंतीचे इंधन निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. लोकांचा विरोध असतानाही केंद्र सरकार E20 इंधन वापरण्याची सक्ती करत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दिल्लीत आज पत्रकार परिषदेला संबोधित करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, “जनतेचा प्रचंड विरोध असूनही केंद्र सरकार E20 इंधनाबाबत हट्ट करत आहे. या हट्टामागील कारण मला माहीत नाही, पण सरकार एकामागून एक दिशाभूल करणारे दावे करत आहे.”
केंद्रावर गंभीर आरोप करत केजरीवाल म्हणाले की, ३ जुलै रोजी केंद्र सरकारने मारुती सुझुकी, टोयोटा किर्लोस्कर, हिरो मोटोकॉर्प, ह्युंदाई मोटर, बजाज ऑटो आणि टीव्हीएस मोटर कंपनी या सहा वाहन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलावले होते. तसेच E20 इंधन वापरण्यास पूर्णपणे योग्य आहे, असा विश्वास जनतेला देण्यासाठी त्यांना पत्रकार परिषद घेण्यास सांगण्यात आले होते.
पुढील आठवड्यात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगत केजरीवाल यांनी थेट सरकारला सवाल विचारला की, पंतप्रधान महोदय, तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे जनतेने का सहन करावे? वाहनांचे मायलेज कमी झाल्यास किंवा इंजिनचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई कोण देणार? तुमचे सरकार की वाहन कंपनी? तसेच त्यांनी पंतप्रधानांना हात जोडून विनंती केली की, ग्राहकांना पेट्रोल पंपांवर E20, E10 आणि E0 असे सर्व इंधनांचे प्रकार वेगवेगळ्या दरांमध्ये निवडण्याचा पर्याय दिला पाहिजे.”






























































