
मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात दाणादाण उडाली आहे. कुठे दरडी कोसळत आहेत, कुठे झाडे पडत आहेत तर कुठे इमारती ढासळत आहेत. अनेक नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत कोसळलेली झाडे अद्यापही रस्त्यांवर पडून आहेत. वसई-विरार-नालासोपारा अजूनही अंधारात आहे. सरकार पुरते गोंधळलेले असून नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना वेळेवर मदतही मिळत नसल्याचे चित्र आहे. याचे तीव्र पडसाद सोशल मीडियात उमटले आहेत. राज्यात सरकार आहे की वाहून गेले, अशी विचारणा नेटकरी करत आहेत. दरम्यान, राज्यातील पर्यटन स्थळे 10 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.




























































