
मुंबईत मुसळधार पावसात शेकडो झाडे उन्मळून पडली. त्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले. या दुर्घटना टाळता याव्यात म्हणून मुंबईतील धोकादायक झाडे ओळखण्यासाठी झाडांचे शास्त्रीय मूल्यांकन महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर वांद्रे येथील पाच हजार झाडांचे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याचा अहवाल मात्र सहा महिन्यांत म्हणजेच पावसाळा संपल्यानंतरच मिळणार आहे.
विधानसभेत भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी ‘द स्माईल काउन्सिल’ यांच्या माध्यमातून मे. ट्रीकोटेक एलएलपी या वृक्षतज्ज्ञ संस्थेची २१ मार्च २०२६ रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. या मूल्यांकनामुळे धोकादायक वृक्षांची ओळख पटवून त्यांच्यावर वेळेत उपाययोजना करणे शक्य होणार आहे. प्रायोगिक मूल्यांकनाचा अहवाल मिळाल्यानंतर मुंबईच्या इतर भागांमधील झाडांचेही असेच मूल्यांकन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
भूमिगत सेवा वाहिन्यांच्या नियोजनासाठी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावेळी डक्ट प्रणालीचा वापर करण्याचे प्रस्तावित असून, सेवा वाहिन्या टाकताना वृक्षांच्या मुळांना कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे शनिवारी महालक्ष्मी येथील साने गुरुजी मार्गावर पिंपळाचे भलेमोठे झाड कोसळले. ही घटना घडून चार दिवस उलटले तरी झाड अजूनही तशाच स्थितीत पडून आहे. एवढे दिवस उलटूनही महापालिका प्रशासनाला याची कानोकान खबर लागली नसल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे.



























































