
अंधेरी येथील मरोळ पोलीस वसाहत अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने लॉटरी काढून येथील रहिवाशांचे बाजूलाच पोलिसांसाठी तयार होत असलेल्या नव्या इमारतीमध्ये पुनर्वसन करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
विधान परिषदेत आमदार अॅड. अनिल परब यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे हा मुद्दा मांडत सरकारचे लक्ष वेधले. अॅड. अनिल परब म्हणाले, अंधेरी मरोळ पोलीस वसाहतीमधील 45, 18 आणि 27 या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेतीत असून कधीही कोसळू शकतात. कालच्या पावसात तिथे गळती, स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडले. या वसाहतीच्या बाजूलाच पोलिसांची हजार घरे तयार होत असून त्यातील सुमारे पाचशे घरे तयार झाली आहेत. या लोकांसाठीच ही घरे बांधली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन तातडीने या घरांची लॉटरी काढून दोन-चार दिवसांत त्यांचे शिफ्टिंग करावे, अशी मागणी अॅड. अनिल परब यांनी केली.




























































