
वरळी येथील दी नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया संस्थेकडून मुंबई महानगरपालिकेला देय शुल्कप्रकरणी लोकलेखा समितीच्या सूचनांचे पालन केले जाईल. तसेच संस्थेच्या कामकाजाची, आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी मंगळवारी केली.
विधान परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने खेळासाठी ही जागा दिली होती, पण या क्लबमध्ये खेळ सोडून राजकीय बैठका, लग्नसोहळे असे इव्हेंट चालतात. लोकलेखा समितीने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही याकडे आमदार अॅड. अनिल परब यांनी लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले, समितीच्या अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. सभागृहात उपस्थित झालेल्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनानंतर 15 दिवसांत बैठक घेण्यात येईल, तर राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिकेने यापूर्वी संस्थेकडून 66 कोटी रुपये व अनधिकृत बांधकामप्रकरणी 11 कोटी रुपये वसूल केले आहेत. थकीत रक्कम टप्प्याटप्प्याने वसूल करण्यात येत आहे, अशी माहिती दिली. संस्थेच्या व्यवहारांचे ऑडिट व चौकशी करून अहवाल तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील. लोकलेखा समितीच्या अहवालातील सूचनांनुसार तसेच चौकशी अहवालाच्या आधारे कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.




























































