
घराबाहेरील विद्युत वायरचा धक्का बसून एकाच कुटुंबातील चारजणांचा मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्नात चौघांना जीव गमवावा लागला. ही मन सुन्न करणारी घटना फलटण तालुक्यातील खामगाव येथे आज पहाटे घडली. या हृदयद्रावक घटनेने फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे.
सतीश ऊर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय 48), त्यांची पत्नी गंगूबाई पिसुरड्या शिंदे (वय 46), मुलगा सचिन पिसुरड्या शिंदे (वय 26) आणि मुलगी आरती पिसुरड्या शिंदे (वय 22, रा. खामगाव, ता. फलटण) आणि सतीश बापूराव निकम (वय 34, रा. राजुरी, ता. फलटण) अशी या दुर्घटनेमधील मृतांची नावे आहेत.
खामगाव येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ शिंदे कुटुंब राहत होते. सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमध्ये अचानक प्रवाह आल्याने सतीश ऊर्फ पिसुरड्या किसन शिंदे यांना विजेचा धक्का बसला. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी गंगूबाई, मुलगा सचिन आणि मुलगी आरती यांनी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने तेही विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला.
या घटनेचे वृत्त वाऱयासारखे पसरल्यानंतर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये प्रवाह कसा आला, यामागे तांत्रिक बिघाड होता की ‘महावितरण’चा निष्कळजीपणा, याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत आहेत. शिंदे कुटुंब एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेल्याने खामगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
राजुरी येथे शॉक लागून एकाचा मृत्यू
फलटण तालुक्यातच राजुरी येथील भवननगर परिसरात राहणारे सतीश बापूराव निकम हे सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घराशेजारी असलेल्या जनावरांच्या गोठय़ाजवळ होते. यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ते गंभीररीत्या भाजून खाली कोसळले. परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी सतीश निकम यांना तातडीने फलटण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सकाळी नऊ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची माहिती अमोल भानुदास निकम यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार चांगण हे करत आहेत.




























































