
भंडारा येथील शंभर खाटांच्या महिला रुग्णालयासाठी लागणारे साहित्य, उपकरणे आणि मशिनरी खरेदी प्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर १५ दिवसांत कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
भंडारा जिल्ह्यातील महिला रुग्णालयासाठी साहित्य खरेदी करताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी ५ कोटी रुपयांची मर्यादा असतानादेखील २८.५० कोटी रुपयांची निविदा काढली. तसेच हॉस्पिटलसाठी लागणारे साहित्य ‘प्रिया पुलर सर्व्हिस’ नावाच्या फर्निचर सप्लाय करणाऱ्या दुकानातून घेतले. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार अॅड. अनिल परब यांनी म. वि. प. नियम ९२ अन्वये उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेदरम्यान केली होती. दरम्यान, निविदा प्रक्रिया नियमानुसार राबविण्यात आली असून, प्राप्त निविदांचे मूल्यांकन करून प्रशासकीय मान्यतेनंतर खरेदी केली आहे. तरीही या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यास त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आबिटकर यांनी दिले.



























































