
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. त्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी, अशी मागणी आमदार चेतन तुपे यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.
दक्षिण मुंबईतील रस्ते खड्ड्यात
दक्षिण मुंबईत विधान भवन, मंत्रालय, लोकभवन अशा महत्त्वाच्या वास्तू आहेत. पण या भागातील खड्डे भरण्याच्या निविदा अद्याप निघालेल्या नाहीत. या महत्त्वाच्या विभागातील रस्तेच खड्ड्यात गेले आहेत, अशा शब्दात काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी आज विधानसभेत नाराजी व्यक्त केली. आपत्कालीन चर्चेत भाग घेताना अमीन पटेल यांनी दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले.
मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे दाखले थांबवले
मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पन्नाचे सर्व दाखले थांबवले आहेत. उत्पन्नाचा दाखलाच नसल्याने रुग्णालयात उपचार घेताना अडचणी येत आहेत. अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. शाळा-महाविद्यालयांतील प्रवेशांनाही अडचणी येत आहेत. लोकप्रतिनिधींनी शिफारसपत्र देऊनही दाखले दिलेले नाहीत. ते तातडीने देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी केली.
पनवेलला मिळणार मुबलक पाणी
पनवेलला आता लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे. पनवेलची ६४ एमएलडी पाणीटंचाई भरून काढण्यासाठी सरकार लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. यासाठी मोरबे धरणातून अधिक पाणी उपलब्ध करून देणे, नावाचीवाडी टप्पा-३ आणि शेलार धरण प्रकल्पांना गती देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



























































