
बालवयातच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीतील तरवा काढणे, भात लावणे, शेतात चिखल करून लावणी करणे यासह शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी वनराई संस्थेतर्फे गाऊडवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बांधावरची शाळा अनुभवण्याची संधी मिळाली. एचडीएफसी बँक परिवर्तन ग्रामीण सर्वांगीण विकास प्रकल्पांतर्गत वनराई संस्थेच्या माध्यमातून प्रात्यक्षिक शेती उपक्रमांतर्गत पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक गाउडवाडी शाळेच्या मुलांना दाखविण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच शेतीबद्दल आवड, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष शेतीचा अनुभव निर्माण व्हावा तसेच भविष्यात कृषी क्षेत्राकडे रोजगार व उद्योजकतेची संधी म्हणून पाहण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे वनराई संस्थेचे शिवराम म्हापणकर व गौरी मायनाक यांनी सांगितले. या प्रात्यक्षिकेवेळी गाउडवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेश भिरोंडेकर, शिक्षिका दिव्या गावकर, शिक्षिका ज्योती गवळी, पल्लवी भुसारी, तसेच आचरा ग्रामपंचायतीचे सदस्य गिरीधर आपकर व अमोल पांगे, वनराईचे प्रथमेश आचरेकर आदी उपस्थित होते.
गाउडवाडी येथील शेतकरी आप्पा आचरेकर, सुंदर आचरेकर, यशवंत आचरेकर, कमलकांत आचरेकर, सर्वेश आचरेकर व दीक्षा आचरेकर यांच्या शेतामधील या प्रात्यक्षिकामध्ये भात उत्पादनाच्या संपूर्ण शास्त्रोक्त प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये बियाणे प्रक्रिया प्रगत भात रोपवाटिका तयार करणे, खतांचे योग्य मिश्रण व वापर रोपांची बुरशीनाशकाद्वारे प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.






























































