
>>मंगेश वरवडेकर
राजांच्या लढाया इतिहासाच्या पुस्तकांत वाचायला मिळतात, पण फुटबॉलमध्ये त्या कधीतरी डोळय़ांनीही पाहायला मिळतात. वर्ल्ड कप जिंकलेले चार सम्राट, फिफाच्या क्रमवारीतील पहिले चार बादशहा आणि चार वेगवेगळय़ा फुटबॉल संस्पृती, हे सारे एकाच वेळी तलवारी उपसून रणांगणात उतरले तर त्याला उपांत्य फेरी म्हणणं म्हणजे महाभारताला काwटुंबिक वाद म्हणण्यासारखं आहे. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री सुरू होणार आहे सिंहासनासाठीचं खरंखुरं युद्ध. ठिणगी पडली आहे, स्पह्ट किती भयंकर असेल ते कळेलच.
2026 च्या वर्ल्ड कपने असाच एक ऐतिहासिक योग घडवला आहे. उपांत्य फेरीत उभे आहेत अर्जेंटिना, स्पेन, फ्रान्स आणि इंग्लंड. चारही संघ माजी विश्वविजेते. गंमत म्हणजे, हेच फिफाच्या जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघ आहेत. वर्ल्ड कपच्या तब्बल 96 वर्षांच्या इतिहासात प्रथमच क्रमवारीतील पहिले चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. म्हणजे चार सिंह एका जंगलात शिकार शोधायला निघाले आहेत. त्यामुळे विजयाची गर्जना कोण करतो हेच पाहायचं आहे.
वर्ल्ड कप इतिहासातील दुर्मिळ योगायोग म्हणजे, चारही उपांत्यवीर आधी वर्ल्ड कप जिंकलेले आहेत. अशी वेळ यापूर्वी फक्त दोनदाच आली होती. 1970 मध्ये ब्राझील, इटली, पश्चिम जर्मनी आणि उरुग्वे. त्या काळी वर्ल्ड कप म्हणजे युरोप आणि लॅटिन अमेरिकेचा कौटुंबिक समारंभ असायचा. बाकीचं जग फक्त निमंत्रित पाहुण्यासारखंच यायचं.
मग 1990 मध्ये पश्चिम जर्मनी, अर्जेंटिना, इटली आणि इंग्लंड हे चार जगज्जेते भिडले. त्या वर्ल्ड कपमध्ये बचावात्मक फुटबॉलची चर्चा जास्त झाली, पण अंतिम सामना मात्र जर्मनी आणि अर्जेंटिना यांच्यात रंगला. युरोप विरुद्ध लॅटिन अमेरिका. हा वर्ल्ड कपमधला पारंपरिक संघर्ष पुन्हा जिवंत झाला.
आणि आता 2026. जग बदललं. फुटबॉल बदलला. विश्लेषण, डेटा, पृत्रिम बुद्धिमत्ता, स्पोर्ट्स सायन्स, अब्जावधींची लीग, आफ्रिकेचा वेग, आशियाची जिद्द, उत्तर अमेरिकेची वाढती ताकद. सारं बदललं, पण शेवटच्या चौघांमध्ये पुन्हा इतिहासाचे चार दिग्गजच उभे राहिले.
अर्जेंटिना म्हणजे फुटबॉलमधले काव्य. स्पेन म्हणजे चेंडूशी संवाद, फ्रान्स म्हणजे वेग, ताकद आणि अफाट प्रतिभेचं मिश्रण. इंग्लंड म्हणजे या खेळाचा जन्मदाता, ज्याने सहा दशकांची प्रतीक्षा मनात साठवून पुन्हा दार ठोठावलं आहे. आता ते दार तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत.
या चार संघांकडे पाहताना एक प्रश्न मनात सतत घोळत राहतो. अंतिम सामना कोणता असावा? स्पेन विरुद्ध इंग्लंड की फ्रान्स विरुद्ध इंग्लंड? दोन युरोपीय संघांची अंतिम लढत नक्कीच दर्जेदार असेल. डावपेचांचा बुद्धिबळाचा डाव पाहायला मिळेल. प्रत्येक पास, प्रत्येक हालचाल सर्जनच्या हातासारखी अचूक असेल. पण वर्ल्ड कपचं खरं सौंदर्य नेहमी पुठे खुलतं? युरोप विरुद्ध लॅटिन अमेरिका.
जणू दोन खंड, दोन संस्पृती, दोन विचारसरणी आणि दोन फुटबॉल तत्त्वज्ञान आमनेसामने उभं ठाकतात. एका बाजूला शिस्त, संरचना, मशीनसारखी अचूकता अन् दुसऱ्या बाजूला कल्पकता, लय, रस्त्यावर जन्मलेली कला आणि भावनांचा ज्वालामुखी.
1986 मध्ये अर्जेंटिना विरुद्ध पश्चिम जर्मनी, 1990 मध्ये पुन्हा तेच, 1994 मध्ये ब्राझील विरुद्ध इटली, 1998 फ्रान्स विरुद्ध ब्राझील, 2002 मध्ये ब्राझील विरुद्ध जर्मनी, 2014 मध्ये अर्जेंटिना विरुद्ध जर्मनी, 2022 मध्ये अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स… या अंतिम सामन्यांनी वर्ल्ड कपच्या इतिहासाला सर्वाधिक रंग भरले. त्या सामन्यांत केवळ ट्रॉफीचा नव्हे, तर दोन फुटबॉल संस्पृतींच्या वर्चस्वाचा निर्णय होत होता. म्हणून मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही अर्जेंटिना विरुद्ध स्पेन किंवा अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स अशी अंतिम लढत पाहण्याची इच्छा दाटून येते. कारण वर्ल्ड कप हा फक्त सर्वोत्तम संघ शोधण्याचा प्रवास नसतो. तो दोन फुटबॉल विश्वांच्या टकरीचाही उत्सव असतो, पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी उद्या दोन महायुद्धं लढायची आहेत.
एका बाजूला लिओनेल मेस्सीच्या जादुई डाव्या पायाला इंग्लंडच्या ज्यूड बेलिंगहॅम, हॅरी केन, बुकायो साका आणि त्यांच्या शिस्तबद्ध फुटबॉलशी मुकाबला करायचाय. मेस्सीच्या कारकिर्दीतील प्रत्येक मोठा सामना हा इतिहासाचा एक अध्याय ठरला आहे. बुधवारीही त्याचीच झलक असेल.
त्याआधी पहिल्या उपांत्य फेरीत किलियन एम्बाप्पेचा वेग, स्पेनच्या यमाल या वादळाशी भिडेल. हा सामना केवळ दोन संघांचा नाही, तर दोन महासत्तांच्या फुटबॉल तत्त्वज्ञानाचा आरसा ठरणार आहे. यंदा उपांत्य फेरीत जे चार संघ उभे आहेत, त्यांच्याकडे मिळून सात वर्ल्ड कप आहेत, असंख्य दंतकथा आहेत आणि लाखो चाहत्यांची स्वप्नं आहेत. त्यामुळे आता प्रत्येक सामना हा अंतिम सामनाच वाटतोय. प्रत्येक संघ जगज्जेता भासतोय. पण वर्ल्ड कप एक आहे. चार सम्राट रांगेत आहेत. परिणामतः उद्याच्या नव्वद मिनिटांत कोणाच्या मुपुटाला नवं तेज मिळेल आणि कोणाचा ताज इतिहासाच्या संग्रहालयात परत जाईल हे ठरेल. पण इतिहास आता फक्त विजेत्याचं नाव लिहिणार नाही. तो 2026च्या उपांत्य फेरीला फुटबॉलच्या सुवर्ण अध्यायांपैकी एक म्हणून कायम जपून ठेवणार आहे.




























































