
मुंबईत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार, निविदा प्रक्रियेचे उल्लंघन आणि निकृष्ट दर्जाची कामे झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेने शहर आणि उपनगरांतील सुमारे 685 किलोमीटर रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी केला आहे. आझमी यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मोठय़ा कंत्राटदारांना कामे दिली असली तरी प्रत्यक्षात बहुतांश कामे उपकंत्राटदारांकडून करून घेतली जात आहेत. यामुळे कामाच्या दर्जावर परिणाम होत असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर भेगा पडणे, पृष्ठभाग उखडणे, योग्य प्रकारे क्युरिंग न करणे आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.





























































