बेकायदा डेब्रिजवर पालिकेचा वॉच, नव्या कचरा व्यवस्थापन पोर्टलच्या माध्यमातून होणार ट्रॅकिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारले जात आहे. परंतु बांधकाम व पाडकाम यामुळे मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण होत असून हा कचरा कुठेही बेकायदेशीररीत्या टाकला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते. याला आळा घालण्यासाठी मुंबई पालिका ‘एकात्मिक बांधकाम व पाडकाम कचरा व्यवस्थापन पोर्टल’ विकसित करणार असून बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्यांवर पालिकेचा वॉच राहील.

८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही या कचऱ्याच्या संकलनापासून ते विल्हेवाटीपर्यंत डिजिटल देखरेख यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. कचरा व्यवस्थापन पोर्टलसाठी पालिकेने ‘ट्रेस रिसोर्स मॅनेजमेंट प्रा. लि.’ या कंपनीची निवड केली आहे. यासाठी सुमारे १ कोटी ११ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

नवे पोर्टल मुंबई पालिकेच्या बांधकाम मंजुरी देणाऱ्या ‘ऑटो डीसीआर’ प्रणालीशी थेट जोडले जाईल. यामुळे कोणत्या बांधकामातून किती कचरा निघणार याचा अंदाज आधीच येईल. याशिवाय डेब्रिज वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस व्हीटीएमएस’ आधारित वाहन नियंत्रण यंत्रणा असेल. त्यामुळे कचरा ठरवून दिलेल्या अधिकृत डम्पिंग स्थळांवर न टाकता वाटेतच कुठेही बेकायदेशीरपणे ओतल्यास त्याची त्वरित माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल.

असे होणार काम…

  • जीपीएस आधारित ट्रॅकिंग: डेब्रिज वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनावर डिजिटल लक्ष ठेवले जाईल.

  • जिओ फेन्सिंग: कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्या ठरवून दिलेल्या मार्गावरूनच जात आहेत की नाही, हे तपासले जाईल.

  • ऑटो डीसीआर एकत्रीकरण: बांधकाम मंजुरी आणि कचरा व्यवस्थापन योजनेची सांगड घातली जाईल.