
जुहू येथे खड्डय़ात साचलेल्या पाण्यात बुडून आज एका मुलाचा मृत्यू झाला. दिनेश बसवराज हरिजन (10) असे या मुलाचे नाव आहे.
सोमवारी दुपारी 1च्या सुमारास जुहू येथील वायरलेस पंपाऊंड, डी.एन. नगर, जागृत हनुमान मंदिर येथे एका खासगी जागेतील तलावात दिनेश हरिजन हा मुलगा त्याच्या 2-3 मित्रांसोबत पोहायला गेला होता. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अथवा त्याला पोहायला येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली व त्यांच्या परीने शोध घेण्यात आला. मात्र तो न सापडल्याने अखेर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीसाठी बोलावण्यात आले. तो सापडल्यानंतर त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.



























































