मुंबई सेंट्रल, गिरगाव, चिराबाजारमध्ये ‘बेस्ट’ची वाहतूक, विद्युत सेवा सुधारा शिवसेनेची महाव्यवस्थापक यांच्यासोबत बैठक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रल, गिरगाव, चिराबाजारमध्ये ‘बेस्ट’ची वाहतूक आणि विद्युत सेवा सुधारा अशी मागणी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने बेस्ट महाव्यवस्थापकांकडे आज करण्यात आली. शिवसेना शिष्टमंडळाच्या वतीने नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत महाव्यवस्थापकांना निवेदनही देण्यात आले.

 

शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांची भेट घेतली. विभागात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची कोणतीही सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. शिवाय मेट्रो-३चे काम पूर्ण झाल्याने मुंबई सेंट्रल-गिरगाव-चिराबाजार मार्गावरील बस क्रमांक ६१, ६५, ६६, ६८, ९८, १२६ आणि मेट्रोच्या कामामुळे बंद करण्यात आलेल्या ७४ व १३० क्रमांकाच्या बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, कर्नाक बंदर-सिंदूर ब्रिज वाहतुकीसाठी खुला झाल्यामुळे या कामासाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली मेट्रो कामादरम्यान हटविण्यात आलेले सर्व बस थांबे नव्याने उभारावेत. विशेषतः सी. पी. हॉस्पिटल, चर्नी रोड येथे आधुनिक, सुरक्षित व सुबक बसथांबा उभारावा, गिरगाव परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्या, जुन्या केबल्स व तात्पुरत्या वायरमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत कार्यवाही करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.

 

भाऊचा धक्का वाळकेश्वर (बस क्र. ४१) ही बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावेळी शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, माजी आमदार अरविंद नेरकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, कुलाबा विधानसभा प्रमुख विकास मयेकर, मलबार हिल विधानसभा समन्वयक शिवाजी रहाणे, उपविभाग प्रमुख बाजीराव मालुसरे, शाखाप्रमुख बाळा आहिरेकर, मंगेश सावंत, संतोष वीर आणि युवासेना विभाग अधिकारी विकास आडुळकर उपस्थित होते.

तक्रारींसाठी तीन महिन्यांत टोल फ्री हेल्पलाइन
बेस्ट ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन तक्रार निवारण पथक नियुक्त केले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत टोल-फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात येईल, अपघात टाळण्यासाठी कंत्राटी चालकांना योग्य प्रशिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन बेस्ट प्रशासनाकडून शिवसेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.