दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडला महापालिका २.४६ कोटी खर्च करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील अनेक वर्षांपासून दादर पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईची दुरुस्ती रखडली आहे. या ४६ वर्षे जुन्या मंडईच्या दुरुस्तीचे काम महापालिका करणार आहे. या कामाला आता मुहूर्त सापडला असून पालिका सुमारे २.४६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

सावरकर मंडई ही सहाय्यक आयुक्त (बाजार) विभागाच्या मालकीची आहे. २०२२ साली मंडईचे स्ट्रक्चरल ऑडिटमधून मेसर्स रेट्रो फिटर्स कन्सल्टिंग इंजिनीअर्सकडून करून घेण्यात आले आहे. त्या अहवालानुसार मंडई ही सी- २ प्रवर्गात असून त्यात मुख्य दुरुस्त्या करण्याची गरज आहेत. या मंडईत सुमारे ३०० किरकोळ व घाऊक विक्रेते आहेत.
मंडईच्या संरचनात्मक दुरुस्ती कामासाठी मेसर्स विकास एन्टरप्राईसेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी २ कोटी ४६ लाख १९,४९६ रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यासहित १८ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

कोणती कामे केली जाणार…
छताकरिता गॅल्व्हॅल्युम पत्रे बसविणे व लाकडी ट्रसची उभारणी करणे, प्लॅस्टिक पाण्याची टाकी बसविणे, रंगकाम, वीट बांधकाम, प्लंबिंगची व ड्रेनेजची कामे, लोखंडी गेट व जाळी बसविणे, लाद्या, दरवाजे व खिडक्यांची कामे, रेन वॉटर गटरची दुरुस्ती, विद्युत कामे अशी कामे केली जाणार आहेत.