गुजरातमध्ये पसरला चांदीपुरा विषाणू, महिनाभरात 12 मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये पाच जिल्ह्यांमध्ये चांदीपुरा विषाणू पसरल्याचे आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. गेल्या महिनाभरात विषाणूजन्य संसर्गामुळे 12 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 3 जणांना चांदीपुरा विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून इतर 9 मुलांचा मृत्यूदेखील याच विषाणूमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतापर्यंत 19 रुग्णांपैकी 9 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 3 मुलांचा मृत्यू झाला असून 4 मुलांवर उपचार सुरू आहेत. गोधरा येथील 2 आणि राजस्थानच्या एका मुलाचा मृत्यू हिम्मत नगर येथे झाला. गांधी नगर, साबरकांठा, खेडा, अरवली आणि पंचमहल जिल्ह्यात चांदीपुरा विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. पंचमहल येथे 13 संशयास्पद रुग्ण आढळले आहेत. तीव्र ताप, उलटी-जुलाब, अंगदुखी, चक्कर येणे इत्यादी लक्षणे या विषाणूचा संसर्ग झाल्यास दिसून येतात. संसर्ग झाल्यास मेंदूपर्यंत तो पसरण्याचा धोका असतो.

लहान मुलांना जास्त धोका

लहान मुलांना या विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. चांदीपुरा विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. रेतीत आढळणारी लहान माशी चावल्यामुळे विषाणूचा प्रसार होतो. गुजरात सरकारने विषाणूचा प्रादुर्भाव आढळलेल्या 61 ठिकाणी सखोल सर्वेक्षण करून औषधांची फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत.