
टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या शेवटच्या दोन आरोपींना सोमवारी भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले असून या सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता व सोनुकुमार दिवाकर हे दोघे अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पवनकुमार यादव (४०, रा. नवी दिल्ली) व हरिओम पानु (२८, रा. हिस्सार हरियाणा) अशी सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली होती. सोमवारी आरोपी पवनकुमार व हरीओम या दोघांना भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एस. एस. घोडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता व सोनुकुमार दिवाकर हे दोघेही अजून फरार असून पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.































































