भाजपच्या अंतापर्यंत मी जिवंत राहीन, याद राखा; ममतांची प्रतिज्ञा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मला हृदयविकाराचा झटका यावा अशी भाजपची इच्छा आहे. त्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, पण तसे काहीही होणार नाही. भाजपच्या अंतापर्यंत मी जिवंत राहणार, याद राखा,’ अशी प्रतिज्ञा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी आज केली.

तृणमूल काँग्रेसचे आमदार व ममतांचे विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनीही बुधवारी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील फुटीर आमदारांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय जाहीर केला. अभिषेक बॅनर्जी हेच या निर्णयाला कारण असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मी फक्त खोली बदलली आहे, माझे घर तेच आहे,’ असे ते म्हणाले. मदन मित्रा यांच्या निर्णयानंतर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ममतांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी मदन मित्रा व भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ‘मदन मित्रा यांची पत्नी आणि दोन मुलांना ईडीने समन्स पाठवल्याने ते आम्हाला सोडून गेले. त्यांच्या निर्णयाचा अभिषेकशी काहीही संबंध नाही,’ असे ममता म्हणाल्या.

अभिषेक हे फक्त निमित्त

ममतांनी अभिषेक बॅनर्जी यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, ‘ज्यांना जायचे आहे, त्यांच्यासाठी अभिषेक हे एक निमित्त झाले आहे. खरंतर अभिषेकला सतत त्रास दिला जात आहे. त्याच्या कुटुंबीयांना समन्स बजावले गेले आहे. ते सत्ताधाऱ्यांपुढे झुकून दिलासा मिळवू शकले असते, पण ते लढाईच्या मैदानातून पळून गेले नाहीत. ज्या पद्धतीने ते लढत आहेत, त्यासाठी त्यांच्या सर्व चुका माफ आहेत,’ असे ममता म्हणाल्या.