
पावसाच्या सरी कोसळू लागल्या की, कोकणातील रानपरिसर एका वेगळ्याच चैतन्याने बहरून जातो. पावसाच्या पहिल्या सरींनंतर निसर्गाच्या कुशीत उगवणाऱ्या गावरान अळंबी (कळंब) या दुर्मिळ रानमेव्याच्या शोधासाठी ग्रामीण भागातील कोकणवासी पहाटेपासूनच जंगलाच्या वाटा धरू लागले आहेत. वर्षातून अवघ्या काही दिवसांसाठी उपलब्ध होणाऱ्या या नैसर्गिक खाद्यपदार्थामुळे सध्या अवघड रानवाटा गजबजून गेल्या आहेत.
कोकणात पावसाळ्यात अळंबीला विशेष महत्त्व आहे. साधारणतः जंगल परिसर, मोकळी राने, पालापाचोळा आणि वारुळांच्या परिसरात पांढऱ्याशुभ्र अळंबी नैसर्गिकरीत्या उगवतात. कोणत्याही प्रकारची लागवड किंवा खतांशिवाय वाढणाऱ्या या अळंबीची चव आणि पौष्टिकता यामुळे ती गावरान खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग मानली जाते. मात्र अळंबी गोळा करताना मोठी दक्षता घ्यावी लागते. खाण्यायोग्य पांढऱ्या अळंबीसोबतच पिवळसर, काळसर किंवा ओंडक्यांवर उगवणाऱ्या काही विषारी जातीही आढळतात. त्यामुळे अनुभवी आणि जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच अळंबी गोळा करण्याचा सल्ला दिला जातो. विषारी अळंबीचे सेवन आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकते. प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि विविध खनिजांनी समृद्ध असलेली अळंबी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. रक्तातील आवश्यक घटकांचे संतुलन राखण्यासही ती उपयुक्त मानली जाते. त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असणारे आणि अस्सल गावरान चवीचे चाहते या दिवसांची आतुरतेने वाट पाहत असतात. वर्षातून केवळ काही दिवसांसाठी मिळणाऱ्या य नैसर्गिक रानमेव्यामुळे सध्या कोकणातील ग्रामीण भागात आनंदाचे आणि चवीचे वातावरण निर्माण झाले असून, निसर्गाशी असलेले माणसाचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.




























































