
मोदी काळात 152 पेपर लीक झाले, पण कोणावरही कारवाई झाली नाही. आता 153 व्या पेपरफुटीवर त्यांना तोंड उघडणे भाग पडले. कारण ‘झुरळां’नी पेटविलेल्या वणव्याचे चटके थेट त्यांच्या निवासस्थानापर्यंत बसले. देशभरातील जनप्रक्षोभाने त्यांचे नाक दाबले गेले. अर्थात, मागील दहा वर्षांत तुमच्या मौनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जी बरबादी झाली त्याचे काय? तुम्ही एकीकडे कठोर कारवाईचे आश्वासन देत आहात आणि दुसरीकडे दिल्लीत ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’चा वरवंटा फिरवत आहात. जनतेने तुमच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? पेपरफुटीप्रकरणी जनक्षोभामुळे तुमचा ‘मौनभंग’ झाला खरा, परंतु तुमचे आश्वासन हे फक्त तोंडच्या वाफाच ठरणार हे जनतेलाही माहीत आहे!
मारून मुटकून का होईना, पण विश्वविराजमान मौनी नरेंद्र बाबाने अखेर पेपरफुटीवर दोन शब्दांचे प्रवचन झोडले आहे. ‘नीट’ पेपरफुटीवर पंतप्रधान मोदींच्या दारातच संतापाचा आगडोंब उसळला आहे. त्याचे चटके बसू लागताच मोदी म्हणतात, ‘‘देशातील विद्यार्थ्यांचे हित आणि भविष्याला प्राधान्य आहे. तेही सर्वोच्च प्राधान्य आहे.’’ मोदी यांच्या बोलण्यात ढोंगाचा भुसा भरलेला असतो. त्यामुळे मौनात तेज वगैरे असण्याची शक्यता नव्हतीच. देशभरात जनता रस्त्यावर आल्याने त्यांचे नाक दाबले गेले आणि मग त्यांना तोंड उघडून हवा सोडावी लागली. मोदी पुढे सांगतात, ‘‘पेपरफुटीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करू. विद्यार्थ्यांच्या हिताशी खेळणाऱ्या पुठल्याही व्यक्तीला सोडले जाणार नाही,’’ असा ‘दम’देखील मोदींनी भरला आहे. हा दम भरायला तुम्हाला इतका वेळ का लागला? मागील दोन महिन्यांपासून दिल्लीतील ‘जंतर मंतर’वर ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि संतप्त विद्यार्थ्यांनी पेपरफुटी प्रकरणावरून एल्गार पुकारला आहे. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात विद्यार्थी ‘आर या पार’च्या लढाईवर उतरले आहेत. देशभरातून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. त्याला घाबरूनच संसदेत
चकार शब्द न काढणाऱ्या
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमाचा त्यांचा नेहमीचा मार्ग निवडला. म्हणजे येथेही त्यांनी त्यांचा अहंकार जपलाच आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांनी काही केले असते तर पंतप्रधानांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा, असे विद्यार्थी आणि जनतेला वाटले असते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत त्यांनी ‘फास्ट ट्रॅक’ची घोषणा केली असती तर त्यांच्या बोलण्याला आधार मिळाला असता. मात्र तसे काहीच घडलेले नाही. त्यामुळे मोदींचे आश्वासन हे ‘हवेतले बुडबुडे’ ठरले आहेत. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची यावरील प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. ‘पेपर लीकवरील मलमपट्टी’ अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या घोषणेची खिल्ली उडवली आहे. ती योग्यच आहे. कारण मोदी त्यांचे आश्वासन पाळतील, याची खात्री कोणालाच नाही. आपल्या 12 वर्षांच्या काळात देशातील ज्वलंत प्रश्नांबाबत ते एकतर मौनात राहिले किंवा आपल्या आश्वासनांना त्यांनी स्वतःच हरताळ फासला. पेपरफुटीप्रकरणी मुख्य मुद्दा आहे तो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा आणि शिक्षणातील भ्रष्ट व्यवस्थेला उखडून टाकण्याचा. मात्र त्यावर अवाक्षर न काढता पंतप्रधान ‘फास्ट ट्रॅक’चे गाजर दाखवत आहेत. जबाबदार असलेल्यांना कठोर शिक्षा वगैरे करण्याचे
फुगे सोडत
आहेत. त्यांच्या या आश्वासनांवर विश्वास कसा ठेवणार? पेपरफुटीची जबाबदारी शिक्षण मंत्री या नात्याने धर्मेंद्र प्रधान यांचीच आहे हे पंतप्रधानांना माहीत नाही का? माहीत आहे, तरीही त्यांनी ना त्यावर ‘ब्र’ काढला ना त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत ते दाखवीत आहेत. मोदी काळात 152 पेपर लीक झाले, पण कोणावरही कारवाई झाली नाही. आता 153 व्या पेपरफुटीवर त्यांना तोंड उघडणे भाग पडले. कारण ‘झुरळां’नी त्याविरोधात पेटविलेल्या वणव्याचे चटके थेट त्यांच्या निवासस्थानापर्यंत बसले. देशभरातील जन प्रक्षोभाने त्यांचे नाक दाबले गेले. अर्थात, मागील दहा वर्षांत तुमच्या मौनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जी बरबादी झाली त्याचे काय? लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या स्वप्नांच्या चुराड्याचे काय? तुम्ही एकीकडे कठोर कारवाईचे आश्वासन देत आहात आणि दुसरीकडे दिल्लीत ‘राष्ट्रीय सुरक्षा कायद्या’चा वरवंटा फिरवत आहात. जनतेने तुमच्या शब्दांवर विश्वास कसा ठेवायचा? पेपरफुटीप्रकरणी जनक्षोभामुळे तुमचा ‘मौनभंग’ झाला खरा, परंतु तुमचे आश्वासन हे फक्त तोंडच्या वाफाच ठरणार हे जनतेलाही माहीत आहे!
































































