
>> वृषाली पंढरी
पंढरपूरला भेट देणाऱया भक्तांचा ओघ वर्षातील 365 दिवस चालू असला तरी चैत्र, आषाढ, कार्तिक आणि माघ शुद्ध एकादशीला पंढरपूरला मोठी गर्दी होते. सध्या सुरू असलेली आषाढी वारी ही वर्षातील सर्वात मोठी यात्रा असून पंढरपूरमध्ये 12 लाखांपेक्षा अधिक वारकरी, विठ्ठलभक्त आषाढी एकादशीला पंढरपूरला भेट देतात. याच दिवशी भल्या पहाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करतात.
वारकऱयांसाठी, विठ्ठलभक्तांसाठी आषाढी एकादशीला तमाम संतांच्या पालख्यांसह वारकरी पायी चालत येत असल्याने या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाची 4 महिन्यांची योगनिद्रा सुरू होत असल्याने तिला देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. तसेच या दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळही सुरू होतो. एकादशीच्या आदल्या दिवशी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यासह इतर संतांच्या हजारो दिंडय़ांसह वारकरी वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि वारकरी आपापल्या दिंडय़ांसह टाळ, मृदुंगाच्या गजरात हळूहळू पंढरपूरकडे मार्गस्थ होतात .तेथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. ‘कुंडलिका वरदे हरिविठ्ठल’ आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तींची राधेसह खास तयार केलेल्या रथातून मिरवणूक निघते. ही मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जाते. हा नेत्रदीपक भक्ती सोहळा आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो, ज्याला गोपालकाला असेही म्हणतात.
यानिमित्ताने एकादशीसंबंधीच्या आख्यायिका जाणून घेऊ या. पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळात मृदुमान्य नावाचा एक अत्यंत बलवान आणि पराक्रमी राक्षस होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अनेक वरदानांची प्राप्ती केली. या वरदानांमुळे तो अधिक शक्तिशाली झाल्यावर त्याने देव, ऋषी, साधू-संत आणि पृथ्वीवरील लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. अखेर सर्व देवांनी भगवान विष्णूंना या संकटातून मुक्त करण्याची विनंती केली. देवतांच्या प्रार्थनेनंतर भगवान विष्णूंनी मृदुमान्याविरुद्ध युद्ध सुरू केले. मृदुमान्य अत्यंत पराक्रमी असल्याने त्याचा पराभव करणे सोपे नव्हते. अखेर दीर्घ युद्धामुळे भगवान विष्णूंनी काही काळ विश्रांती घेण्यासाठी हिमालयातील एका गुहेत प्रवेश केला. ते योगनिद्रेत गेले असतानाच मृदुमान्य त्यांचा वध करण्याच्या उद्देशाने त्या गुहेत पोहोचला. त्याच वेळी भगवान विष्णूंच्या दिव्य तेजातून एक अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि शस्त्रसज्ज देवी प्रकट झाली. त्या देवीने मृदुमान्याला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि अखेर त्या दिव्य शक्तीने मृदुमान्याचा वध केला. त्यानंतर भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे झाले. देवीचा पराक्रम पाहून विष्णूंनी वरदान मागण्यास सांगितले. देवीने लोकांच्या कल्याणासाठी वरदान मागितले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन सांगितले की, ज्या दिवशी तू प्रकट झालीस ती तिथी ’एकादशी’ म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जे भक्त श्रद्धेने उपवास करतील, भगवान विष्णूंचे पूजन, नामस्मरण, जप आणि दानधर्म करतील, त्यांची पापे नष्ट होतील, त्यांना पुण्यप्राप्ती होईल आणि शेवटी मोक्षाचाही मार्ग खुला होईल. तेव्हापासून प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व प्राप्त झाले.






























































