
>> सुनील उंबरे
पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं । प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे ।।
संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगामध्ये पंढरीचे केलेले हे वर्णन सार्थ करण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमधून 25 लाखांहून अधिक श्री विठ्ठल भक्तांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला आपली हजेरी लावली आहे. विक्रमी संख्येने आलेल्या या भाविकांच्या उपस्थितीमुळे चंद्रभागा वाळवंट, भक्ती सागर, नगरप्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, दर्शन रांग आदी भागांत पाय ठेवायला जागा नाही इतकी तोबा गर्दी पहायला मिळते. सर्वत्र डौलाने फडकणाऱया भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा मधुर निनाद, रामकृष्ण हरी, ग्यानबा तुकारामाचा गगनाला गवसणी घालणारा नामजप, अशा सगळ्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरणाने विठुरायाची पंढरी नगरी अक्षरशः भक्तिरसात चिंब झाली.
भक्तीच्या उत्साहाला उधाण आलेले असताना हजारो भाविक श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पदस्पर्श व मुखदर्शन रांगेत उभे आहेत. पदस्पर्श दर्शनाची रांग जवळपास 15 किलोमीटर दूरवर गेली असून दर्शनासाठी वीस तासांहून अधिकचा वेळ लागत आहे. तर मुखदर्शनासाठी सहा ते आठ तास लागत आहेत. दरम्यान पंढरीच्या दाही दिशांनी देवाचा धावा करीत दिंडय़ा आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. गुरुवारी (दि. 23) वाखरी येथे विसावलेला मुख्य पालखी सोहळा शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी पंढरीकडे मार्गस्थ झाला. प्रमुख पालखी सोहळे शहरात दाखल होण्यापूर्वीच पंढरी नगरी वारकऱयांनी फुलून गेली आहे. दाखल झालेल्या वारकऱयांची शुक्रवारी चंद्रभागा नदीच्या पवित्र स्नानासाठी झुंबड उडाली. वीस लाखांहून अधिक वारकऱयांनी स्नानाचा आनंद लुटला. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल असा टिपेचा ब्रह्मनाद चंद्रभागा नदीच्या आसमंतात घुमत होता.
दर्शनासाठी 20 तासांची प्रतीक्षा
आषाढी यात्रेकरिता आलेले भाविक पदस्पर्श दर्शन घेण्यास उत्सुक असतात. त्यामुळे दर्शन रांगेत उभे आहेत. दर्शन रांगदेखील मंदिरापासून पुढे सारडा भवन, पत्राशेडमधून पुढे गोपाळपूर ते रांझणी रोडवर दाखल झाली आहे. येथील 20 दर्शन शेड भरून दर्शन रांग पुढे रांझनीकडे गेली आहे. दर्शनासाठी 20 तासांचा कालावधी लागत आहे. दर्शन रांगेत जर्मन हँगर उभारले आहेत. तिथे पिण्याचे पाणी, अन्नदान सुरू आहे.
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो वारकरी भाविक दाखल झाले आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा जयघोष करत, टाळ-मृदुंगाच्या तालावर नगर प्रदक्षिणेसाठी निघालेल्या दिड्या आणि पालख्यांनी पंढरी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. pic.twitter.com/wsYp3oyEHr
— Saamana Online (@SaamanaOnline) July 24, 2026




























































