मोहन भागवत म्हणतात, “परिस्थिती बदललीय, नवी पिढी प्रश्न विचारणारी; त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे!”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी विद्यार्थी, पालक रस्त्यावर उतरून भारतीय जनता पक्ष आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाविरोधात संताप व्यक्त करत आहे. आंदोलनाचे लोण देशभरात परसलेले असतानाच आता यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही एक विधान केले आहे. आता परिस्थिती बदलली असून आजची तरुण पिढी प्रश्न विचारणारी आहे. त्यांना तर्कावर आधारित उत्तरे हवी असतात, असे मोहन भागवत म्हणाले. तसेच या मुलांशी प्रेमाने संवाद साधणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, आम्ही लहान असताना आज्ञापालनाचे युग होते. आता परिस्थिती बदलली आहे. नवी पिढी प्रश्न विचारते. त्यांना तर्कावर आधारित उत्तरे हवी असतात. त्यांना भरपूर प्रेम द्यावे लागेल. त्यांच्यासोबत वेळ घालवावा लागेल. त्यांच्याशी सातत्याने संवाद साधावा लागेल. आजच्या काळात कुटुंबांमध्येही संवाद कमी झाला आहे.

नवी पिढी प्रत्येक गोष्टीत तर्क शोधते आणि त्यांचा हुकूमशाहीवर नाही, तर चर्चेवर विश्वास आहे. काहीवेळा मुले असे प्रश्न विचारतात, विशेषतः परदेशात, की या देवाचे तोंड माकडासारखे का आहे आणि या देवाचे तोंड हत्तीसारखे का आहे? ती घरी येतात आणि हे प्रश्न विचारतात, पण वडिलांना उत्तर माहीत नसते आणि आईलाही माहीत नसते. हा भाग पाठ्यपुस्तकांचा असायला हवा, तरीही मुलांना केवळ पाठ्यपुस्तकांच्या भरवशावर सोडता येणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

पालकांनी मुलांच्या प्रश्नांना संयमाने उत्तरे द्यावीत. स्वतःचे ज्ञान सातत्याने वाढवत राहावे आणि आपल्या आचरणातून आदर्श घालून द्यावा. मुलांना उपदेशापेक्षा कृतीतून अधिक शिकायला मिळते, असेही मोहन भागवत म्हणाले. ‘एएनआय‘ या वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

मातृत्वाशिवाय जीवनाची निर्मिती, संगोपन आणि सातत्य अशक्य आहे. मातृत्व या विषयावर पुरुषाने बोलणे हे काहीसे विरोधाभासी वाटू शकते, कारण हा विषय नैसर्गिकरित्या महिलांशी निगडित आहे. या विषयावर विश्व मांगल्य सभाने सखोल चर्चा केली असून स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या विचारवंतांनीही मातृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते आणि संपूर्ण आयुष्यात भावनिक बळ देणारा सर्वात मोठा आधार असते. माणसाला विचार करण्याची क्षमता लाभली असली, तरी त्या विचारांना योग्य दिशा देण्याचे कार्य आई करते, असेही ते म्हणाले.