सरकारने घेतला ‘कॉक्रोच’चा धसका; दिल्लीतील 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेशापर्यंत बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन हे आंदोलन सुरू झाले असून याला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. जंतरमंतर येथे देशभरातून विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकारही आणि नेतेमंडळीही पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक मोठा निर्णय घेतला असून दिल्लीतील प्रमुख 18 मेट्रो स्थानकं पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. शुक्रवारी मध्यरात्री उशिरा डीएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

कोणती मेट्रो स्थानकं बंद राहणार?

शनिवारी सकाळी 7.30 वाजेपासून लोक कल्याण मार्ग, पटेल चौक, राजीव चौक, केंद्रीय सचिवालय, जोरबाग, जनपथ, खान मार्केट, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंभा रोड, सुप्रीम कोर्ट, मंडी हाऊस, इंद्रप्रस्थ, सेवा तीर्थ, आयटीओ (ITO), दिल्ली गेट, शिवाजी स्टेडियम, झंडेवालान आणि नवी दिल्ली ही मेट्रो स्थानकं बंद राहणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास मंडी हाऊस, राजीव चौक आणि केंद्रीय सचिवालय या स्टेशनचे प्रवेशद्वार काही काळासाठी उघडण्यात आले होते, मात्र शनिवारी सकाळी 7.30 पासून पुन्हा बंद करण्यात आली.

नागरिकांचे हाल, इंटरनेट सेवा ठप्प!

शुक्रवारी सायंकाळच्या वेळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. परिसरात इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे ऑनलाईन कॅब (ओला/उबर) बुक करणे अशक्य झाले होते. याचा गैरफायदा घेत ऑटो रिक्षाचालकांनी नागरिकांकडून अवाढव्य भाडे उकळले. अनेक प्रवाशांना पायपीट करत गंतव्य स्थळ गाठावे लागले. “आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचणे सोपे होते, पण परतताना आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. इंटरनेट बंद असल्यामुळे कॅब मिळत नाहीये आणि मेट्रो स्टेशन बंद आहेत. प्रशासनाने किमान या परिसरापर्यंत बस प्रवासाची सोय करायला हवी होती”, अशी प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.

CJP Protest Dharmendra Pradhan – अभिजीत दिपके यांना टायफॉइड झाल्याचे निदान, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

इतिहासात पहिल्यांदाच मेट्रो स्थानकं दीर्घकाळ बंद?

दरम्यान, एकाच वेळी आणि एवढ्या दीर्घ काळासाठी एवढी मेट्रो स्टेशन बंद राहण्याची ही पहिलीच वेळ असावी, अशी शक्यता डीएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. सलग किती काळ स्टेशन बंद राहिली याचा जुना रेकॉर्ड सध्या उपलब्ध नसला, तरी तासांच्या हिशोबाने विचार केल्यास एवढ्या मोठ्या प्रमाणावर मेट्रो सेवा बंद राहण्याची ही दिल्ली मेट्रोच्या इतिहासातील सर्वात मोठी किंवा बहुदा सर्वात प्रदीर्घ टाळेबंदी ठरू शकते, असे ते म्हणाले.