
एका झुरळाने हुकूमशाहाला झुकवले, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने विद्यार्थी आणि तरुणांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलक तरुणांचे जाहीर अभिनंदन करत सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.
माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अभिजित दिपके आणि या देशातील सर्व तरुणांचं आणि साहजिकच त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचं आहे. कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढलं. गेली १२ वर्षे जवळपास रोज काही ना काही दबाव देशाच्या जनतेवर सरकारकडून आणला जात होता. मग ती नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेले नाहीत, आहेत ती सगळी झुरळं आहेत, या प्रकाराने हे सत्ताधारी वागत होते. आज मला तो एक डायलॉग आठवला, ‘एक मच्छर साला आदमी को…’ तसं एका झुरळाने हुकूमशाहाला झुकवलं आहे. ज्यांनी या तरुणांना झुरळं म्हटलं, त्यांनीसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की, आपण केवळ खुर्चीत बसला आहात म्हणून डोक्यात माज गेलाय, असे वागू नका. देशातील युवा शक्ती जर का एकत्र आली तर काय करू शकते, त्याची ही झलक आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “अभिजित दिपके यांचं एक ट्वीट पाहिलं, त्यांनी सांगितलं आहे की, आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही. कारण अजून त्यांच्या दोन मागण्या बाकी आहेत. महत्त्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिला आहे की खातेबदल केला आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र त्यांनी राजीनाम्याचं पत्र सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांचं पुढे काय होणार? कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बीभत्स, भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा संपूर्ण जगासमोर आलेला आहे. ज्या पद्धतीने तरुणांवरती लाठ्या चालवल्या गेल्या, ज्या पद्धतीने तिथे आलेल्या युवतींवरती हात उचलला गेला; आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक युवती अत्यंत व्यथित होऊन, व्याकुळ होऊन सांगत होती की, तिच्या कपड्यांनासुद्धा हात घातला गेला. आता या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार? आणि साध्या वेशातील जे गुंड तिथे घुसवले गेले होते, यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही? एकूणच या विद्यार्थ्यांवर कुठेही गुन्हे दाखल केले गेले असतील तर, ते मागे घेणार आहेत की नाही? हे आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं पाहिजे. कारण ज्या पोलिसांनी दंडेलशाही केली, तरुणांवरती लाठ्या-काठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल, तर मग कदाचित ही तरुणाई धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून अमित शहा यांच्याकडे मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही.”
ते म्हणाले की, “मला असं वाटतं की, या तरुणांना खास धन्यवाद दिले पाहिजेत. याचं कारण असं की, या देशामध्ये जणू काही आता लोक राहतच नाहीत, ही सगळी झुरळं आहेत, आपण काहीही केलं, कशीही मस्ती दाखवली तरी ते चालवून घेतलं जातं, हा जो काही एक समज किंवा हा जो एक भ्रम भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मस्तवाल सत्ताधाऱ्यांनी निर्माण केला होता, ते चित्र यांनी भुईसपाट करून टाकलेलं आहे. म्हणून यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या देशामध्ये क्रांतीची ठिणगी विझलेली नाही. अजूनही क्रांतिकारक जन्माला येऊ शकतात. त्याची एक चुणूक यानिमित्ताने संपूर्ण जगाला आपल्या देशातील तरुणांनी दाखवून दिली आहे.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “उद्याचा मार्च हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षांनंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत. मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं कालसुद्धा आम्ही विचार केला, जर का आम्ही रविवारी मोर्चा काढत आहोत तर, मग कालचा (शुक्रवारी) कार्यक्रम कशाला करायचा? पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांना असंख्य लोकांनी संदेश पाठवले की, आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार. आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे. त्यामुळे या युवा शक्तीची ताकद मोठ्या प्रमाणावर मुंबईतून तमाम जनतेला किंवा दुनियेला आपण दाखवली पाहिजे, म्हणून उद्याचा जो मोर्चा आहे, तो कार्यक्रम असाच राहील.”


























































