आमच्या तिन्ही मागण्या मान्य, केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या पत्रकार परिषदेत CJP प्रवक्त्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पक्षाने जंतरमंतर येथील आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यांच्या तिन्ही मुख्य मागण्या मान्य झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जंतरमंतर येथील आंदोलकांना शांततेने आंदोलनस्थळावरून निघून जाण्याची विनंती केली.

या बैठकीत सीजेपीच्या अनेक प्रमुख मागण्यांवर तोडगा निघाला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला असून, सीजेपीची ही पहिली आणि प्रमुख मागणी सरकारने मान्य केली आहे. तसेच देशभरात आंदोलनकर्त्यांवर जिथे-जिथे गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत, ते सर्व मागे घेण्याचे सरकारने मान्य केले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत FIR मागे घेतल्याची प्रत सीजेपीला दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यावर, आंदोलनकर्त्यावर किंवा सीजेपीच्या संयोजकांवर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सरकारने याबाबत मंगळवारी लेखी हमी देण्याचे मान्य केले आहे. आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीबाबत नियमानुसार भरपाई देण्यावरही सरकारची सहमती झाली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत सीजेपी प्रवक्त्यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना सौरव दास यांनी सांगितले की, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आणि गुन्हे मागे घेण्यासोबतच आम्ही पाच कलमी मागण्या सरकारसमोर ठेवल्या होत्या. या मागण्यांवर आणि परीक्षा प्रक्रियेतील व्यापक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी चार आठवड्यांनंतर सरकारसोबत पुन्हा एक बैठक होणार आहे.