सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडले, देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा हा मोठा विजय – शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारला राजीनामा देण्यासाठी भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या साक्षीचं प्रतिक आहे. युवा शक्तीच्या एकजुटीचा विजय आहे. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांचं मी आभार मानतो. देशातील लोकशाहीने कात टाकलं आहे. त्याचं श्रेय युवाशक्तीला जाते. हे नमूद करावं वाटतं, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

शरद पवार बोलताना म्हणाले की, देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं,लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे,हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे,नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे,असे शरद पवार बोलताना म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, पेपरफुटीने अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. आनंद हा आहे की संयमाने आणि शांततेने युवा पिढीने आपल्या भावना देशाच्या नेतृत्वासमोर मांडल्या. त्यांना यश आलं. चर्चेच्या दोन तीन फेऱ्या झाल्या होत्या. मी स्वत: पंतप्रधानांना भेटलो होतो. त्यांना विनंती केली, लोकशाहीत संवाद ठेवण्याची आवश्यकता असते. संवाद न ठेवल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्ही चर्चा सुरू ठेवली पाहिजे,एक तर राजीनामा घ्या किंवा संवाद सुरू करून त्यांचं ऐका. तुम्ही तुमच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक दोन ज्येष्ठ मंत्र्यांना आंदोलकांशी चर्चा करण्यास सांगा. मी अभिजीत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देखील सांगितल होतं की, सरकार संवाद साधायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका, सुदैवाने त्यांची बोलण्याची तयारी दाखवली, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की,आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला, दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे,हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे,असे शरद पवार बोलताना म्हणाले.