मुद्दा – भारतातील रेल्वे प्रवास किती सुरक्षित?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अनंत बोरसे

काही दिवसांपूर्वी मुलुंड स्थानकात एसी लोकलची एसी यंत्रणाच बंद पडली. त्यामुळे अनेक महिला प्रवासी बेशुद्ध पडल्या. नशिबाने केवळ एवढ्यावरच निभावले. त्याअगोदर नागपूर येथील महिला परप्रांतातून देवदर्शन करून परत येत असताना त्यांचे आरक्षण असूनही त्यांना आपली हक्काची जागा मिळाली नाही. उलट त्यांच्याबरोबर गैरवर्तन केले गेले. त्यांच्या मदतीला ना रेल्वे प्रशासन धावून आले ना आरपीएफ यंत्रणा. मध्यंतरी पश्चिम रेल्वेवर केवळ लोकलचा दरवाजा लावण्याच्या वादातून एकावर चापूहल्ला  आणि त्यात एका युवकाचा बळी गेला होता, तर दुसऱ्या एका घटनेत एका तरुण प्राध्यापकाची हत्या करण्यात आली होती. मुंबई परिसरातील आसपासच्या भागातून जवळपास 75-80 लाख दररोज प्रवास करतात. कोणी शिक्षण, व्यवसाय, नोकरी, धंदा करण्यासाठी येतो, तर कोणी वैद्यकीय उपचारांसाठी येतो. त्यामुळेच तर लोकल सेवा ही मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. त्याच बरोबर याच मुंबईत दररोज येणाऱ्या परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. मात्र लोकल सेवा तसेच मेल, एक्स्प्रेस गाडय़ांची क्षमता अपुरी पडत आहे. मध्य रेल्वेच्या कल्याणपुढील दक्षिण भारत तसेच उत्तर भारतात जाण्यासाठी केवळ दोनच मार्ग आहेत. त्यामुळे लोकल फेऱया वाढविता येत नसल्याचे रडगाणे नेहमीच गायले जाते. मात्र त्याच वेळी लांब पल्ल्याच्या अधिकच्या प्रवासी गाडय़ा मात्र धावतात. किमान सुखकारक, किफायतशीर भाडय़ात प्रवास व्हावा, गाड्या वेळेवर चालवाव्यात एवढीच प्रवाशांची माफक अपेक्षा आहे. मात्र नेमके तेच होत नाही. त्यामुळे लोकल प्रवास असो की मेल, एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवास हा कधीच सुखकारक होत नाही. केवळ फर्स्ट क्लास किंवा वरच्या वर्गाचा क्लास सोडून नित्यनियमाने प्रवास करणाऱया प्रवाशांना एसी भाडे परवडणे शक्यच नाही. त्यातूनही एखाद्या वेळी सामान्य प्रवासी खर्चिक प्रवास करतो.

2017 पासून अगोदर पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सुविधा चालू करण्यात आली. मात्र ही सेवा सुरू करण्यात आली ती साधारण लोकलच्या फेऱया रद्द करून. त्यामुळे साधारण लोकल गर्दी वाढली आणि सोयीपेक्षा गैरसोय झाली म्हणून प्रवाशांनी आंदोलन केले. कालांतराने एसी लोकल सेवा मध्य तसेच हार्बर मार्गावर सुरू करण्यात आली. मात्र हार्बर मार्गावरील एरवी लोकल सेवा खंडित करण्यात आली आणि एक-दोन वर्षांपूर्वी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेचा विस्तार आता उरणपर्यंत झाला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली असून परिणामी लोकलची गर्दी वाढते आहे. वाढत्या गर्दीची परिणती प्रवाशांमधील भांडणात होत असून अनेकदा हाणामारी, प्रसंगी हत्या होणे यात होत आहे. लोकल किंवा लांब पल्ल्याच्या प्रवाशांची खरी गरज लक्षात न घेता एसी लोकलचा अट्टाहास धरून प्रवाशांवर महागडा प्रवास लादला जात आहे. त्याचप्रमाणे मेल, एक्स्प्रेसमध्ये अनारक्षित, स्लिपर क्लासचे डबे अधिक असणे गरजेचे असताना त्याऐवजी एसी टू टियर, थ्री टियरचे डबे वाढविले जात आहेत, तर कधी कधी संपूर्ण एसी ट्रेन धावत आहेत. राजधानी, वंदे भारतसारख्या महागडय़ा गाडय़ांचे तिकीट दर परवडण्यासारखे नाहीत. त्यातही प्रीमियम भाडे, तत्काल बुकिंगच्या नावाखाली प्रवाशांकडून अधिकचे भाडे वसूल केले जाते. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर कोकणवासीय कोकणात जातात. मात्र त्या गाडय़ांचे बुकिंग अगदी काही सेपंदातच फुल्ल होते, यावर्षीदेखील असेच झाले. जिथे सामान्य डब्यातील प्रवासी मेंढरांसारखे दाटीवाटीने गर्दीतून प्रवास करतात, तिथे कधी कधी उच्च वर्गातील डबे पूर्ण क्षमतेनेदेखील भरत नाहीत. या सगळ्यात प्रवाशांची गैरसोय तर होतेच, पण आर्थिक लूटदेखील होते.

एसी लोकल वाढविण्याची मागणी ना कोणी प्रवासी ना कोणत्या प्रवासी संघटना करताना दिसतात. मात्र तरीदेखील एसी लोकलचा अट्टाहास धरून प्रवाशांवर महागडा प्रवास लादला जात आहे आणि प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. रेल्वे ही सेवा आहे, ना की पैसा कमावण्याचा उद्योग. मात्र गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचे आंशिक खासगीकरण आणि पंत्राटीकरण होत आहे आणि त्याची किंमत सामान्य प्रवाशांना मोजावी लागते आहे. एसीने प्रवास करणारे जेमतेम 30-40 टक्के प्रवासी असु शकतात. त्यासाठी सामान्य प्रवाशांवर महागडा प्रवास लादणे कितपत योग्य आहे? आजच्या घडीला तर काही रेल्वे या खासगी कंपन्या, काॅर्पोरेट सेक्टर यांना चालविण्यास आंदण दिल्या आहेत. देशभरातील रेल्वे प्रवासी हा सामान्य माणूस आहे. त्याला पंचतारांकित सुविधा नकोत, तर किमान किफायतशीर दरात तसेच सुखकारक सुरक्षित प्रवास एवढीच माफक अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवासीभिमुख दृष्टिकोनातून आपली जबाबदारी पार पाडायला हवी.