
शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर दिव्यातील लहान मुलांना आता मुबलक प्रमाणात ‘विटामीन ए’ औषध मिळणार आहे. येथील आरोग्य केंद्रांमध्ये १०० बाटल्यांचा पुरवठा करण्यात आला असून आशा वर्कर्सनादेखील बालकांना सहजपणे औषध देता येईल. दिवा शहर व परिसरातील सुमारे ७ हजार ५०० मुलांना पुरेल एवढा विटामीन एचा साठा उपलब्ध झाल्यामुळे पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तत्त्वांनुसार ९ महिने ते ५ वर्षे वयोगटांतील लहान मुलांमधील कुपोषण तसेच अंधत्व रोखण्यासाठी विटामीन एचा डोस देणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दिव्यातील आरोग्य केंद्रांमध्ये हा पुरवठा न झाल्यामुळे असंख्य गरीब व गरजू कुटुंबातील बालके डोसपासून वंचित राहिली होती. ही बाब शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांना समजताच त्यांनी ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला.




























































