दादरमध्ये ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉकची उभारणी करा; शिवसेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील मध्यवर्ती वाहतूक केंद्र असलेल्या दादरमध्ये ट्रॅव्हलेटरयुक्त (सरकते पट्टे) स्कायवॉकची उभारणी करा, अशी मागणी शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. दादर मेट्रो स्थानक, दादर पश्चिम/मध्य रेल्वे स्थानक, एशियाड बस स्थानक आणि विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक यांना जोडणारा ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉक उभारण्याची सूचना पत्राद्वारे केली आहे.

दादर हे मुंबईतील प्रमुख आणि मध्यवर्ती वाहतूक केंद्र असून येथे प्रवासाची विविध सुविधा केंद्रे एकवटली आहेत. पश्चिम व मध्य रेल्वेची स्थानके, मेट्रो-3 मार्गावरील दादर स्थानक, दादर (पूर्व) येथील विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक तसेच मुंबई-पुणे व इतर मार्गावरील एसटीचे एशियाड बस स्थानक या प्रमुख स्थानकांना जोडणारा एकही एकात्मिक पादचारी पूल किंवा स्कायवॉक अस्तित्वात नाही. त्यामुळे दररोज लाखो प्रवाशांना गर्दीच्या रस्त्यांवरून वाहतूककोंडीचा सामना करत एका स्थानकातून दुसऱ्या स्थानकात पायी प्रवास करावा लागत आहे. त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरात लवकर ट्रॅव्हलेटरयुक्त स्कायवॉकची उभारणी करण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्याची सूचना खासदार अनिल देसाई यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.

सुसज्ज स्कायवॉक कोठून कुठपर्यंत

महालक्ष्मी येथील पूर्णत्वास येत असलेल्या ट्रॅव्हलेटरच्या धर्तीवर दादर मेट्रोच्या रानडे रोड येथील प्रवेशद्वारापासून (रानडे रोड मार्गे) दादर पश्चिम व मध्य रेल्वे स्थानक, पुढे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामार्गे दादर एशियाड बस स्थानक आणि शेवटी मोनोरेलचे दादर (पूर्व) येथील विठ्ठल मंदिर स्थानक असा ट्रॅव्हलेटरसह सुसज्ज स्कायवॉक उभारण्यात यावा, असे खासदार देसाई यांनी पत्रातून सूचित केले आहे.