
हवामान बदलाचा ग्रामीण जनतेवर मोठा परिणाम झाल्याचे गंभीर वास्तव ‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन’च्या सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणात सहभागी 92 टक्के वारकऱयांनी गावात तापमान वाढल्याचे नमूद केले, तर 68 टक्के वारकऱ्यांनी शेतीवर थेट परिणाम झाल्याची व्यथा मांडली. ऊन वाढलंय, पाऊस बदललाय, शेतीचं गणित बिघडलंय, असा चिंतेचा सूर वारकऱ्यांच्या तोंडून बाहेर पडला.
‘बाईमाणूस मीडिया रिसर्च फाऊंडेशन’ने आषाढी वारीमध्ये सहभागी झालेल्या जवळपास एक हजार वारकऱयांशी संवाद साधला. त्याच आधारे फाऊंडेशनने ‘क्लायमेट अॅण्ड कल्चर-क्लायमेट लिसनिंग सर्व्हे-2026’ हा अहवाल तयार केला. सर्वेक्षणात सहभागी 91.7 टक्के वारकऱ्यांनी त्यांच्या परिसरातील तापमान वाढल्याचे सांगितले. तसेच पाणीटंचाई, अनियमित पाऊस, शेतीतील वाढती अनिश्चितता, पिकांना योग्य भाव अशा प्रश्नांनी ग्रामीण समाजाचे जगणे अधिक अस्थिर झाल्याचा निष्कर्ष सर्वेक्षण अहवालात नोंदवला. या पार्श्वभूमीवर फाऊंडेशनचे संस्थापक-संपादक प्रशांत पवार यांनी ग्रामीण भागातील वास्तवावर भाष्य केले. हवामान बदलावर धोरणे तयार करताना ग्रामीण समाजाचे अनुभव तितकेच महत्त्वाचे आहेत. वारीच्या पाऊलवाटेवरून ऐकू आलेल्या आवाजाला राज्याच्या हवामान धोरणात स्थान मिळायला हवे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.




























































