
हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेते देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद (70) यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. सोमवारी सकाळी लंडन येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुनील यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.
सुनील आनंद यांनी अमेरिकेतील ‘अमेरिकन युनिव्हर्सिटी’, वॉशिंग्टन डीसी येथून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण पूर्ण केले. 1984 मध्ये त्यांनी ‘आनंद और आनंद’ या चित्रपटातून सहाय्यक अभिनेता म्हणून पदार्पण केले. पुढे त्यांनी ‘कार थीफ’, ‘मैं तेरे लिए’ आणि ‘मास्टर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही. 2011 मध्ये देव आनंद यांच्या निधनानंतर त्यांनी वडिलांच्या प्रॉडक्शन हाऊस ‘नवकेतन फिल्म्स’ची जबाबदारी सांभाळली.




























































