पडद्याआडून – जुन्याच रंगांचा नवा जल्लोष! पुनरुज्जीवित नाटकांचा रंगभूमीवर सुवर्णकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

मराठी रंगभूमीवर सध्या एक वेगळीच लाट पाहायला मिळत आहे. नव्या विषयांची, नव्या प्रयोगांची नाटके येत असतानाच दुसरीकडे एकेकाळी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या कलाकृती नव्या संचात, नव्या मांडणीत पुन्हा रंगमंचावर अवतरत आहेत. विशेष म्हणजे हा केवळ ‘नॉस्टॅल्जिया’चा खेळ नसून व्यावसायिकदृष्ट्याही हा ट्रेंड यशस्वी ठरतोय. आता पुन्हा रंगभूमीवर येणारे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक या प्रवाहातील आणखी एक महत्त्वाचे नाटक, नवा ताजेपणा घेऊन येत आहे. डॉ. विवेक बेळे यांच्या शैलीदार लेखणीतून उतरलेले हे नाटक प्रेक्षकांना नाट्यगृहात पुन्हा खेचून आणेल हे नक्की.

सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या सूर्याची पिल्ले, भ्रमाचा भोपळा, एकदा पाहावं करून, सविता दामोदर परांजपे, कुणीतरी आहे तिथे, ऑल द बेस्ट, मोरूची मावशी अशा अनेक गाजलेल्या नाटकांनी चांगले यश मिळवले आहे. यातील बहुतेक नाटकांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही नाटकांचे मर्यादित प्रयोग करण्याचा प्रारंभीचा विचार होता; मात्र तिकीटबारीवरील प्रतिसाद पाहता त्यांची घोडदौड सुरूच राहिली. ‘एकदा पाहावं करून’मध्ये रत्नाकर मतकरी यांच्या प्रसंगनिष्ठ विनोदाला आजही तितकीच जोरकस दाद मिळतेय. दिग्दर्शक विजय पेंकरे यांनी या नाटकाची तीन अंकी मांडणी तशीच ठेवून यातला विनोद आजच्या पिढीला आवडेल असा फुलवलाय. त्यामुळे पुनरुज्जीवित नाटक प्रेक्षकांना आवडते हे सिद्ध झाले. आता या यादीत ‘काटकोन त्रिकोण’ची भर पडत आहे.

पुनरुज्जीवित नाटकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कसदार संहिता. काळ बदलला, कलाकार बदलले, रंगमंचावरील तंत्रज्ञान बदलले; पण उत्कृष्ट लेखनाचा दर्जा मात्र कालातीत असतो. त्यामुळे या नाटकांकडे आजही प्रेक्षक आकर्षित होतात. त्यात दिग्दर्शक आजच्या प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेचा विचार करून गती, मांडणी, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि अभिनयशैलीमध्ये आवश्यक बदल करतात. त्यामुळे जुनी संहिता नव्या पिढीशी संवाद साधू लागते.

या पुनरुज्जीवनाच्या चळवळीचा उल्लेख झाला की अभिनेता सुनील बर्वे यांच्या ‘हर्बेरियम’ उपक्रमाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो. कारकिर्दीच्या पंचवीस वर्षांच्या निमित्ताने त्यांनी सूर्याची पिल्ले, लहानपण देगा देवा, हमिदाबाईची कोठी, आंधळं दळतंय आणि झोपी गेलेला जागा झाला यांसारख्या अजरामर नाटकांना नवजीवन दिले. मर्यादित प्रयोगांच्या या उपक्रमाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला. प्रेक्षकांनी अगदी रांगा लावून हे प्रयोग ‘हाऊसफुल’ केले. त्यातून हे सिद्ध झाले की, दर्जेदार कलाकृतींना काळाचे बंधन नसते.

मात्र पुनरुज्जीवित नाटकांचा प्रवास तितकासा सोपा नाही. आज युट्यूब किंवा डिजिटल माध्यमांवर अनेक जुन्या नाटकांचे चित्रीकरण सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात मूळ प्रयोगाची प्रतिमा आधीच तयार झालेली असते. नव्या कलाकारांची त्या दिग्गजांशी तुलना होणे अपरिहार्य ठरते. हीच या प्रकारातील सर्वात मोठी कसोटी असते.

दुसरे महत्त्वाचे आव्हान म्हणजे आर्थिक गणिते जुळवणे. साठोत्तरी आणि नव्वदच्या दशकातील अनेक नाटकांमध्ये सात-आठ कलाकार, दिमाखदार नेपथ्य, विस्तृत वेशभूषा आणि भव्य रंगमंचीय मांडणी असते. बरीचशी नाटके तीन अंकी असतात. त्यामुळे निर्मितीखर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचे मत आहे की, अशा नाटकांना शासनाकडून अनुदान मिळाले तर अधिकाधिक दर्जेदार कलाकृती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकतील. तर प्रसाद कांबळी यांसारखे निर्माते व्यावसायिक दृष्टिकोनालाच अधिक महत्त्व देतात.

चंद्रकांत कुलकर्णी, दिनू पेडणेकर आणि भरत जाधव यांच्यासारख्या रंगकर्मींचेही मत आहे की, पुनरुज्जीवित नाटकांचा हेतू केवळ व्यवसाय करणे हा नसून मराठी रंगभूमीचा अमूल्य वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांनी तीस वर्षांनंतर सादर केलेल्या ‘चारचौघी’ या नव्या संचातील नाटकालाही तेवढाच जबरदस्त प्रतिसाद लाभला होता.

पुनरुज्जीवित नाटकांचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे नव्या कलाकारांना दर्जेदार संहितांमध्ये काम करण्याची संधी मिळते. एकेकाळी डॉ. श्रीराम लागू, विक्रम गोखले, मोहन आगाशे, भक्ती बर्वे, रीमा लागू, दिलीप प्रभावळकर यांसारख्या दिग्गजांनी गाजवलेल्या भूमिका आजची पिढी नव्या दृष्टिकोनातून साकारत आहे. त्यामुळे परंपरा आणि वर्तमान यांच्यातील दुवा अधिक मजबूत होत आहे.

आजचा प्रेक्षकही बदलला आहे. तो फक्त करमणूक शोधत नाही; तर चांगली कथा, उत्तम संवाद आणि दर्जेदार अभिनय अनुभवू इच्छितो. त्यामुळेच पुनरुज्जीवित नाटकांना ‘हाऊसफुल्ल’चे फलक लागतात. ज्यांनी ही नाटके पूर्वी पाहिली आहेत त्यांच्यासाठी हा आठवणींचा सोहळा असतो; तर नव्या पिढीसाठी मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळाची पहिली भेट ठरते.

जुनी गाजलेली नाटके नव्याने रंगमंचावर सादर करणे हे निर्मात्यांसाठी एक आव्हान असते आणि जोवर हे धाडस करणारे निर्माते नाट्यक्षेत्रात आहेत तोपर्यंत हा आनंद प्रेक्षकांना मिळत राहील. प्रत्येक उत्कृष्ट नाटकाचा एकच जन्म नसतो. काळानुसार ते नव्या रूपात पुन्हा जन्म घेत राहते. कारण खरी कलाकृती कधीच जुनी होत नाही; ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहते. मराठी रंगभूमीवर सध्या सुरू असलेला पुनरुज्जीवित नाटकांचा हा प्रवास म्हणजे आपल्या समृद्ध नाट्यवारशाचा उत्सवच म्हणावा लागेल.