
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांना कोलकाता नाईट रायडर्सने एक मोठी जबाबदारी दिली आहे. या माजी डच फलंदाजाची फ्रँचायझीच्या ‘हेड ऑफ क्रिकेट स्ट्रटेजी’ (क्रिकेट रणनीती प्रमुखपदी) नियुक्ती करण्यात आली आहे.
भूमिका काय असेल?
टेन डोशेट यांच्या नवीन जबाबदाऱया महत्त्वपूर्ण असतील. ते खेळाडू शोधणे, संघ निवड, संघ नियोजन आणि कामगिरीचे मूल्यांकन यासाठी जबाबदार असतील. ते सर्व नाईट रायडर्स संघांमध्ये एकसारखे क्रिकेट तत्त्वज्ञान आणि रणनीती लागू करण्यासाठी प्रशिक्षण कर्मचाऱयांसोबत मिळून काम करतील. नाईट रायडर्स ग्रुपमधील अनेक संघ जगभरातील विविध टी-20 लीगमध्ये सहभागी होतात. टेन डोशेट कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्स, यूएईच्या आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये अबू धाबी नाइट रायडर्स आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये लॉस एंजेलिस नाइट रायडर्ससाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम पाहतील.
टेन डोशेट काय म्हणाले…
टेन डोशेट यांनी आपल्या नवीन भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, नाइट रायडर्समध्ये पुन्हा सामील होण्याचा त्यांना सन्मान वाटतो. या भूमिकेमुळे त्यांना फ्रँचायझीच्या प्रशिक्षण आणि विश्लेषण संघांसोबत काम करण्याची, खेळाडू विकास प्रणाली मजबूत करण्याची आणि दीर्घकालीन क्रिकेट रणनीती विकसित करण्याची संधी मिळेल.
केकेआरसोबतचा दीर्घकाळचा संबंध
टेन डोशेट यांचा नाइट रायडर्ससोबत दीर्घकाळचा संबंध आहे. ते 2011 मध्ये खेळाडू म्हणून कोलकाता नाइट रायडर्समध्ये सामील झाले. 2012 आणि 2014 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱया केकेआर संघाचा भाग म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर ते 2022 मध्ये फ्रँचायझीच्या प्रशिक्षण स्टाफमध्ये सामील झाले आणि 2024 मध्ये जेव्हा केकेआरने तिसरे आयपीएल विजेतेपद जिंकले तेव्हा ते सपोर्ट स्टाफचा भाग होते.



























































