
प्रसिद्ध हिंदी वृत्तवाहिनी ‘आजतक’वरून 120 हून अधिक कर्मचाऱयांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात प्रामुख्याने 40 ते 50 हजार रुपये वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोशल मीडियामुळे मुख्य टीव्ही वाहिन्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याची चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे.
टीव्ही वाहिन्यांना मिळणाऱ्या जाहिराती घटल्याने त्यांचे उत्पन्न मोठय़ा प्रमाणावर घसरले आहे. कंपन्यांना आता टीव्हीपेक्षा सोशल मीडियावर जाहिरात देणे अधिक स्वस्त आणि फायदेशीर वाटत आहे. आजतक वाहिनीचा नफा एकाच वर्षात 111 कोटींवरून थेट 29 कोटींवर आला आहे. तसेच वाहिन्यांवरील वाढता पक्षपातीपणा आणि निष्पक्षतेचा अभाव यामुळे नागरिक टीव्ही बातम्यांपासून दुरावत आहेत.
आज वृत्तवाहिन्यांची जागा सोशल मीडियाने घेतली असून तेथे सत्य प्रखरपणे मांडले जात आहे. त्यामुळे भविष्यात सोशल मीडिया मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांचे अस्तित्व संपवणार का, असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही बाब समोर येताच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.



























































