
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंग ते आधुनिक’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या या कार्यक्रमातून संतवाणीपासून आधुनिक मराठी गीतांपर्यंतच्या संगीताचा सुरेल प्रवास रसिकांसमोर उलगडला गेला.
‘अभंग ते आधुनिक’ या कार्यक्रमात गायक नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी आणि धनश्री देशपांडे यांनी आपल्या सुमधुर गायनातून अभंग, भक्तिगीते, भावगीते तसेच आधुनिक मराठी गीतांचे सादरीकरण केले. संतपरंपरेतील अभंगवाणी आणि आधुनिक मराठी संगीत यांचा सुरेल संगम अनुभवण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली. डॉ. समीरा गुजर-जोशी यांनी प्रत्येक सादरीकरणाची पार्श्वभूमी आणि मराठी संगीतपरंपरेतील त्याचे महत्त्व उलगडून सांगितले. या कार्यक्रमाला महापौर रितू तावडे, मुंबई भाजप उपाध्यक्ष किरण शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्रीराम पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन स्वरवंती क्रिएशन्स यांनी केले होते.






























































